व्हीएस न्यूज – लिलावातील ट्रक विकत घेतल्याच्या रागातून चार जणांनी त्या ट्रकवरील चालकाचे अपहरण करुन त्यास मारहाण केली. तसेच मोबाइल हिसकावून घेतला आणि ट्रकचालकास लोहगाव वन विभागाच्या हद्दीत सोडून ट्रक घेऊन पसार झाले. ही घटना मंगळवारी (दि.31) रात्री साडे दहाच्या सुमारास भोसरी-आळंदी रस्त्यावरील मयुरी पॅलेससमोर घडली.
शिरुरमधील एका 52 वर्षीय ट्रकचालकाने फिर्याद दिली असून, याप्रकरणी सागर शिंदे व इतर तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी अमोल व रशीद यांच्याकडे ट्रकचालक म्हणून काम करतो. अमोल आणि रशीद यांनी यांनी आरोपी सागर शिंदे याचा ट्रक लिलावात विकत घेतला होता. याचा राग मनात धरुन आरोपी आणि त्याच्या मित्राने ट्रकसह चालकाचे अपहरण करून मारहाण केली. तसेच ट्रकचालकाचा मोबाइल हिसकावून घेवून त्याला लोहगाव वन विभागाच्या हद्दीत सोडून ट्रकसह पसार झाले. ट्रकमध्ये दोन ब्रास वाळूही होती. भोसरी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी.आर. कठोरे पुढील तपास करत आहेत