व्हीएस न्युज - अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या पौड रस्त्यावरील कार्यालयाची तोडफोड करून त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार रविवारी दुपारी घडला. काही दिवसांत प्रदर्शित होत असलेल्या मराठी चित्रपटावरून हे कार्यालय फोडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रवीण तरडे यांनी फेसबुकवर लाईव्ह करत हा प्रकार किरकोळ असून, तोडफोड करणारी मुले माझ्याच तालुक्यातील आहेत. गैरसमजातून त्यांनी हे केले असून, चित्रपट पाहिल्यानंतर त्यांचा गैरसमज दूर होईल, असे म्हटले आहे.
याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांमध्ये नवीन मराठी चित्रपट येत आहे. यातील काही संवाद आणि घटना पुण्यातील कुख्यात गुंड संदीप मोहोळवर आधारित असल्याबाबतची तक्रार पुणे पोलिसांकडे मोहोळ याच्या नातेवाइकांनी केली आहे.
दरम्यान, रविवारी दुपारी मोहोळ याच्या बहीण व नातेवाइकांनी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना फोन करून चित्रपटावर आक्षेप असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तरडे यांनी त्यांना चित्रपट पाहा त्यानंतर आक्षेपावर बोलू, असे म्हणत त्यांना पौड रोडवरील कार्यालयात बोलावले होते. त्यावेळेस काहीजण त्याठिकाणी गेले होते. चित्रपट पाहिल्यानंतर तरडे आणि त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर धक्काबुक्की व किरकोळ तोडफोडीचा प्रकार घडला असल्याची माहिती कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी दिली.
दरम्यान, चित्रपटातील गाण्यांमध्ये गुन्हेगारांच्या समावेशामुळे हा चित्रपट वादाच्या भोवर्यात आहे. तसेच यातील संवाद आणि घटनांमुळे मानहानी होत असल्याची तक्राराही मोहोळ याच्या बहिणीने केली आहे. त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेकडूनही गोपनीय माहितीच्या आधारे टोळ्यांची झाडाझडती सुरू केली आहे. ही झाडाझडती काही सराईत पुन्हा सक्रिय झाल्याने केली जात असून, त्याला या चित्रपटाची पार्श्वभूमी असल्याचे सांगितले जाते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002