व्हीएस न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व वसुंधरा क्लब पुणे यांच्या वतीने निगडी येथे 11 ते 13 नोव्हेंबर कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पर्यावरण विषयक विविध लघुपट, अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. नदी वाचवा, जीवन वाचवा हा यंदाच्या महोत्सवाचा हेतू असणार आहे. यावेळी जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी दिली.
या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (दि.11) नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटनानंतर लगेच पर्यावरण विषयक विविध लघुपट आणि अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्राशी संबधित असलेल्या समस्या व आव्हानांचा शोध घेऊन, त्यावर कायमस्वरूपाची उपाययोजना व समाधान शोधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पिंपरी-चिंचवडमध्ये संपन्न होणार आहे.
शनिवारी (दि.11) सकाळी सहा वाजता एम्प्रेस गार्डन येथे निसर्ग अभ्यास सहलीचे ही आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता संभाजीनगर येथील नोव्हेल ज्युनिअर कॉलेजमध्ये गिर्यारोहण प्रात्यक्षिके, उपकरणांची माहिती दिली जाणार आहे. दुपारी चार वाजता सावरकर सभागृहात पर्यावरण बाजार (पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री) व निसर्ग विषयक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपटाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता घरातील ओल्या कच-यापासून बायोगॅस व खत निर्मिती या विषयावर कार्यशाळा होणार आहे.
दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा व वसुंधरा सन्मान पुरस्काराचे वितरण सोमवार सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यावेळी खासदार अमर साबळे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित राहणार आहेत. जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना वसुंधरा सन्मान तर व्यंकटेश भताने, सोमनाथ म्हसुडगे देहूगाव यांना वसुंधरा मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे. यावेळी श्रीकांत मापारी, नरहरी वाघ, राजेश देशमुख,विजय सातपुते, भास्कर रिकामे आदी उपस्थित होते.
पवना नदी अभ्यास वर्ग…
रविवारी (दि.12) सकाळी आठ वाजता चिंचवड येथील पवना नदी घाटावर भावसर व्हिजनच्या वतीने पवना नदी अभ्यास वर्गाचे आयोजन केले आहे. सकाळी दहा वाजता कदम सभागृहात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपट प्रक्षेपण होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सायकल फॉर रिव्हर नदी वाचवा, जीवन वाचवा संदेश देणारी सायकल फेरी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ येथून सुरु होऊन पवना नदी घाटावर शपथ ग्रहण करण्यात येईल.
25हून अधिक शाळांमध्ये प्रबोधन…
सोमवारी (दि.13) सकाळी सात वाजता देहूरोड येथील घोरावडेश्वर मंदिरावर निसर्ग सहल जाणार आहे. सकाळी दहा वाजता सावरकर सदनातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी चित्रपट व फोटो प्रदर्शनाला भेट देणार आहेत. या महोत्सवात शहरातील 25 पेक्षा जास्त शाळांमधून पर्यावरण प्रबोधन करणारे विषयक लघुपट दाखविले जाणार आहेत. नदी वाचवा जीवन वाचवा या विषयाशी संबधित निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002