व्हीएस न्युज - मेरीट लँडमार्क या फसव्या कंपनीद्वारे दामदुप्पट, बक्षीस व प्लॉट देण्याच्या बहाण्याने शेतकऱ्याला तब्बल १८ लाखांचा गंडा घालणाऱ्या कंपनीच्या सदस्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये कंपनीने इतर नागरिकांनाही कोट्यावधीचा गंडा घातल्याचा प्रकार यातून उघड झाला आहे.
याप्रकरणी सोना आण्णा साठे (वय-४३, रा. जवळके, अहमदनगर) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पिंपरी पोलिसांनी आरोपी महादेव विश्वनाथ साळुंके (वय-४८, रा. सांगवी), महेश प्रकाश मुंगसे (वय-३७, रा. चिखली), सुरेश भानुदास जाधव (वय-४४, रा. देहुरोड) व किरण प्रकाश अटपाळकर (वय-२४, रा. हिंगणे, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. यातील महादेव व सुरेश जाधव यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाचही जणांनी पिंपरी येथील कमला क्रॉस रोड येथे मेरीट लँडमार्क ही कंपनीचे ऑफीस सुरु केले होते. या कंपनीद्वारे त्यांनी साठे यांना विश्वासात घेतले व त्यांना दाम दुप्पटीचे, बक्षिसाचे व प्लॉट देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी रोख १८ लाख रुपये घेतले. यावेळी साठे यांना कंपनीच्या नावाच्या पावत्या व सर्टिफिकेट दिले. यातील कंपनीने आत्तापर्यंत १ लाख ४० हजार रुपये साठे यांना कंपनीने दिले आहेत. मात्र त्यानंतर एकही परतावा कंपनीने दिलेला नाही. हा घोटाळा केवळ साठे यांच्यापुरताच नाही तर समृद्ध जीवन प्रमाणे अनेकांचे पैसे या कंपनीने बुडवल्याचा प्रकार सोमार आला आहे. यामध्ये मेरीट लँडमार्क ही कंपनी उघडून एजंटनी त्यांच्या जनसंपर्काचा वापर करत बीड, कोल्हापूर, पुणे, जळगाव व मुंबई येथील नागरिकांचे कोट्यावधी रुपये गोळा केले होते. त्या पैशांचा वापर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. याप्रकरणी आरोपींना पोलीस कस्टडी सुनावण्यात आली असून याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख करीत आहेत.
पिंपरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, पोलीस हवालदार राजेंद्र भोसले, पोलीस नाईक जावेद बागसिराज, महिला पोलीस नाईक प्रतिभा मुळे यांनी ही कारवाई केली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002