व्हीएस न्यूज – ड्युटी लावण्याच्या कारणावरुन चिडलेल्या एका एसटी चालकाने वल्लभनगर बसस्थानकातील वाहतूक निरीक्षकास पट्टयाने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.3) सायंकाळी साडे सहा वाजता वल्लभनगर बस स्थानकात घडली.
वाहतूक निरीक्षक हेमंत बंडोपंत खामकर (वय 42 रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी बस चालक नारायण आण्णा सोनवणे (वय 38, रा. राजगुरुनगर, खेड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वल्लभनगर आगरात त्यांच्या कार्यालयात काम करतात. गेली दोन महिन्यांपासून ड्युटी लावण्यावरुन सोनवणे व खामकर यांच्यात वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी याच कारणावरुन सोनवणे याने काहीही न बोलता त्याच्याहातातील बेल्टच्या बक्कलने खामकर यांना मारहाण केली. याप्रकरणी सोनवणेवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.