व्हिएस न्युज - लॉकडाउन तसेच कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर दारूसेवान करणारे तसेच अन्य व्यसने करणाऱ्यांना दारू आणि अन्य गोष्टी मिळत नसल्याची परिस्थिती आहे. एरवी सहजतेने उपलब्ध होणारे दारू, तंबाखू तसेच गुटखा सेवन करणे आता परवडेनासे झाले आहे. चोरटय़ा मार्गाने दारू, तंबाखू तसेच गुटख्याची वाहतूक होत आहे. कात्रज घाटात वाहतूक पोलिसांनी रात्री दुधाच्या टेम्पोतून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी बिअरची बारा खोकी जप्त केली.
सलीम बशिर शेख (वय २४) आणि सिद्धार्थ संजय मिसाळ (वय २५, दोघे रा.भिलारेवाडी,कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरोधात मुंबई दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लॉकडाउन मध्ये अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रशासन तसेच पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. रात्री कात्रज घाटात भारती विद्यापीठ वाहतूक शाखेने नाकाबंदी लावली होती. पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस हवालदार नरेंद्र पारखी, तोंडे, भिंगारे, झुंजार या भागातून जाणाऱ्या वाहनांची तपासणी करत होते.
त्या वेळी पोलिसांना संशय आल्याने त्यांनी घाटात दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला थांबण्याची सूचना केली. टेम्पोतील चालक शेख आणि मिसाळ यांची चौकशी सुरू केली तेव्हा ते गडबडले आणि पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली तेव्हा टेम्पोत दूध ठेवण्यासाठी येणाऱ्या प्लास्टिकच्या जाळीमागे (कॅरेट) बिअरची खोकी ठेवल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी टेम्पोतील बिअरची खोकी जप्त केली. जप्त करण्यात आलेल्या बिअरच्या बाटल्यांची किंमत २८ हजार ८०० रुपये आहे. वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी भारती विद्यापीठ वाहतूक शाखेतील पोलीस पथकाचे कौतुक केले.
अत्यावश्यक सेवा स्टिकरचा गैरवापर
या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी शेख अणि मिसाळ यांनी दूध वाहतुकीच्या टेम्पोला अत्यावश्यक सेवेतील वाहन असे स्टिकर लावले होते. पोलिसांकडून कारवाई होऊ नये म्हणून त्यांनी हे स्टिकर लावले होते. आरोपींनी सातारा रस्त्यावरील शिरवळ येथून बिअरची खोकी आणली होती. दोनशे रुपयांची बाटली ते सहाशे रुपयांना विकणार होते, अशी कबुली शेख आणि मिसाळ यांनी पोलिसांना दिली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002