व्हीएस न्यूज – महाराष्ट्राबाहेरील मायक्रो फायनान्स कंपन्यांनी गेल्या दहा वर्षांपासून कष्टकरी सर्वसामान्य महिलांना कर्जवाटप करून वेठीस धरले आहे. राष्ट्रीयकृत बॅंका गरजूंना कर्ज देत नाहीत. तर दुसरीकडे महाराष्ट्रात हजारो कोटी रूपये मायक्रो फायनान्स कंपन्यांनी महिलांच्या घरी जावून वाटले आहेत. याचा तपास व्हायला हवा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांनी केली.
जुनी सांगवी, नवी सांगवी, औंध कॅंम्प, पिंपळे गुरव परिसरातील खासगी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून कर्ज घेतलेल्या महिलांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण कर्जमुक्ती महिला मेळावा सांगवी येथील सुमनश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोझर बोलत होते. मनसेचे पिंपरी चिंचवड पालिकेचे गटनेते सचिन चिखले, माजी नगरसेविका जयश्री मारणे, शहर सचिव राजू सावळे, रविदास काळे, स्नेहल बांगर, शाम जगताप, हेमंत डांगे, संजय यादव आदी उपस्थित होते.
मोझर पुढे म्हणाले, गेल्या पंधरा ते वीस वर्षांपूर्वी सुरू झालेली महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची आर्थिक चळवळ या खाजगी कंपन्यांमुळे मोडकळीस आली आहे. कष्टकरी सर्वसामान्य महिलांना एकत्रित करून या कंपन्यां घरपोच कर्ज वाटतात. कर्ज परतफेड दर आठवड्याला करावी लागते. महिलांच्या समूहाला कर्ज दिले जाते. मात्र, घरातील पुरूषांना या ग्रुप बैठकीस थांबण्याची परवानगी नसते. समुहाद्वारे दिलेले कर्ज परतफेड करण्यासाठी ग्रुपमधील प्रत्येक महिलेला शेवटच्या कर्जदार महिलेचा कर्जहप्ता भरेपर्यंत थांबावे लागते. मायक्रो फायनान्स ही संकल्पना महाराष्ट्रात आणून त्यांना लायसन्स देण्यात आली आहेत.
आज ही विषावळ कष्टक-यांची आर्थिक पिळवणूक करत मोठी होत आहे. कर्ज परत फेडीसाठी कंपन्यातील ही मंडळी कर्जदार महिलांना, त्यांच्या कुटुंबांना धमकावतात, तुम्हाला दुसरे कुठलेच कर्ज मिळणार नाही,घरातील मुलांना सरकारी नोकरीसाठी अडथळा येईल, अशा धमक्या देऊन कर्ज परतफेड करून घेतात. अशा प्रकारचा मानसिक दबाव अनेक कुटुंबे सहन करत आहेत. या गोष्टींना वेळीच आळा घातला नाही, तर मनसेसैनिक रस्त्यावर उतरतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लवकरच मंत्रालयावर याबाबत धडक मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मोझर यांनी सांगितले. आमचा उद्रेक होतो, ते अशा घटनांमुळेच, असेही ते यावेळी म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002