व्हीएस न्यूज - मध्यस्थांचा वावर कमी व्हावा, तसेच विवाहाची प्रक्रिया पारदर्शक व्हावी, यासाठी विवाहासाठी द्यावयाची नोटीस आता ऑनलाइन पध्दतीने देता येणार आहे. राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या विवाह नोंदणी, ई पेमेंट, अर्जदारांना ई मेलवर 30 दिवस मुदतीची नोटीस देणे आदी सुविधा 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी दिली.
नोंदणी पद्धतीने विवाहामध्ये पारदर्शी व विनामध्यस्थ सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे विवाह नोंदणी कार्यालयातील गर्दी कमी होऊन मध्यस्थांकडून होणारी आर्थिक लूट पूर्णतः बंद होणार आहे. ऑनलाइन नोंदणीनंतर दोन्ही अर्जदारांच्या नोंदणी संदर्भात ऑनलाइन नोटीस जाहीर केली जाईल, त्यावर हरकती व सूचना ऑनलाइन नोंदवू शकणार आहेत. त्यानंतर 60 दिवसांच्या आत वर-वधू आणि 3 साक्षीदारांसमक्ष विवाह नोंदणी अधिकाऱ्यांसमोर विवाह संपन्न करून प्रमाणपत्र दिले जाईल,’ असेही महानिरीक्षक कवडे यांनी सांगितले.
“विशेष विवाह कायदा,1954′, प्रमाणे वधू-वर यांनी आवश्यक त्या अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. नोटिशीच्या दिवशी विवाहेच्छुक वधूचे वय 18 वर्षे आणि वराचे वय 21 वर्षे पूर्ण असावे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी महा ई सेवा केंद्रांवर शुल्क भरून देखील नोंदणी करू शकता येणार आहे. त्यामुळे नोटीस देण्यासाठी विवाह अधिकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. प्रत्येक टप्प्यावर मोबाइल मेसेज येणार आहे. नोटीस बोर्ड संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002