मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांची माहिती
व्हीएस न्यूज - भूखंडाचा चालू बाजारभाव आणि अवैध बांधकाम नियमितीकरण दंड आकारून पिंपरी – चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) हद्दीतील बांधकामे नियमित केली जाणार आहे. त्यासाठी आकुर्डीतील पीसीएनटीडीए कार्यालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. शुक्रवारपासून नियमितीकरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. संपादित क्षेत्रावरील बांधकामे नियमितीकरणासाठी भूखंडाची किंमतही बांधकामधारकाकडून घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सतीशकुमार खडके म्हणाले, महापालिका क्षेत्र आणि पीसीएनटीडीए क्षेत्रातील बांधकामे हा वेगवेगळा विषय आहे. पीसीएनटीडीएने संपादित केलेल्या जागांवर झालेली बांधकामे नियमितीकरण सरकारी धोरणानुसारच केले जाणार आहे. त्यासाठी अवैध आणि अतिक्रमित बांधकाम अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पीसीएनटीडीए कार्यालयात या कामी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. याठिकाणी नागरिकांना अर्ज जमा करता येणार असून त्यासाठी प्रति अर्ज दोनशे रूपये शुल्क आकारले जाणार आहे. नामिकासुचीतील वास्तुविशारदांमार्फत अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. 31 डिसेंबर 2015 पर्यंतचीच बांधकामे नियमित केली जाणार आहे.
अर्जासमवेत भूखंड भोगवट्याबाबतचा कायदेशीर पुरावा, जसे भाडेपट्टा किंवा सातबारा किंवा इंडेक्ट टू, रजिस्टर्ड खरेदी खत, नोटरी केलेले खरदी खत किंवा कायदेशीर पुरावा आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2015 पूर्वी महापालिकेकडे टॅक्स भरलेले पुरावे, कर भरल्याची पावती, कर मागणीपत्र. बांधकामाचे खरेदीखत, अभिलेख पुरावा, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड, विजेचे बील यासारखे पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. नियमितीकरणाबाबतचे हमीपत्र, सिटी सव्रहे विभागाकडील मोजणी आणि मोजणी शुल्क, अधिकमुल्य, विकास प्रशमन शुल्क भरण्यासंदर्भात संमतीचे हमीपत्र, बांधकामाचे स्थळदर्शक नकाशे चतु:सीमांसह चार प्रति देणे आवश्यक आहे. तसेच स्ट्रक्चरल ऑडीटचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. एकापेक्षा अधिक सहधारक असल्यास त्या भूखंडावरील सहधारकांचे एकत्रित अर्ज आणि हमीपत्र देता येणार आहे.
असा असेल रहिवास क्षेत्रासाठी दंड…
रहिवास क्षेत्रासाठी चालू बाजारभावाप्रमाणे जागेची रक्कम वसूल केली जाणार आहे. त्याचबरोबर विकास शुल्कही आकारण्यात येणार आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ गुणिले जमीनीचे बाजारमुल्य तक्यातील दर, गुणीले अर्धा टक्का, बांधकामाचे क्षेत्रफळ, जमीनीचे बाजारमुल्य तक्यातील दर गुणीले दोन टक्के असे विकास शुल्क तसेच इतकेच पायाभूत सुविधा शुल्क, तसेच प्रशमन शुल्क हे विकास शुल्काच्या दुप्पट असणार आहे.
वाणिज्य वापरासाठी दुप्पट दर…
रहिवास वापर आणि वाणिज्य वापरासाठी वेगवेगळे दर असणार आहेत. रहिवासासह वाणिज्य वापरासाठी रहिवास दराच्या दीडपट आणि वाणिज्य वापरासाठी दुप्पट दर लागू असेल. वाणिज्य वापरासाठी रेडीरेकनरच्या दुप्पट दर आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर विकास शुल्क, पायाभूत सुविधा शुल्क तसेच प्रशमन शुल्क भरावे लागणार आहे. पीसीएनटीडीए परिसरातील बांधकामांसाठी एक चटई निर्देशांक संमत आहे. याशिवाय बाल्कनी, पॅसेज, टेरेस, जिना या करीता अधिमूल्य (प्रिमीयम) भरावा लागणार आहे. वाढीव मजले नियमितीकरणासाठी जादा दर भरावा लागेल.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002