व्हीएस न्यूज - लोककल्याणकारी योजनेवरील खर्च कमी करुन परदेशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कामगार कायदे बदलण्याचा घाट घालत रोजगार निर्मितीच्या नावाखाली नॅशनल एम्प्लॉयमेंट इन्हान्समेंट स्कीम (नीम) सरकार लादू पाहत आहे. त्यामुळे जुने कंत्राटी व कायम कामगार उध्वस्त होणार असल्याची भीती कॉम्रेड भालचंद्र कानगो यांनी आकुर्डी येथे व्यक्त केली.
ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियनची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आकुर्डीतील श्रमशक्ती भवनामध्ये पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानाहून कॉम्रेड कानगो बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी युनियनच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. सभेमध्ये 31 डिसेंबर 2016 पर्यंतचा आर्थिक वर्षाचा ताळेबंद व अहवाल सादर करण्यात आला. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली.
कॉम्रेड कानगो म्हणाले की, मोदी सरकार कामगार कायद्यात मालक धार्जिणे बदल करु पाहत आहे. याचा परिणाम कामगार वर्गावर जाणवत आहे. नीमच्या नावाखाली जुन्या कंत्राटी व कायम कामगारांना पर्याय म्हणून स्वस्तात मनुष्यबळ मिळवून देण्याचा मार्ग भांडवलदारांसाठी सरकारने खुला करुन दिला आहे. यामुळे कामगारांना तात्पुरता रोजगार मिळेल. मात्र, कायमस्वरुपी नोकरीला त्यांना मुकावे लागणार आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून अल्प वेतन मिळणार असल्याने त्यात उदारनिर्वाह देखील अशक्य होणार आहे. एकीकडे कामगार वर्गात अस्वस्थता असताना दुसरीकडे सरकारने नोट बंदी केली. या निर्णयाला एक वर्ष झाले. परंतु, देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. जुन्या व पारंपारिक व्यवसायावर नोट बंदीचा मोठा परिणाम झाला आहे. काळा पैसा मिळाला नाहीच उलट सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
जीएसटी विधेयक लादल्याने महागाई, बेरोजगारी आणि विषमता वाढत चालली आहे. वेळोवेळी कर्जमाफी व शेतमालाला योग्य हमी भावाचे गाजर दाखवून तसेच व्यापार नियोजनाच्या अभावामुळे सरकारने शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असल्याचा आरोप कॉम्रेड कानगो यांनी केला. कामगार संघटनांचे मूलभूत हक्क व मागण्यांकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करुन सरकार परदेशी गुंतवणूक देशात आणून कामगारांना त्यांचे गुलाम करु पाहत आहे. खोट्या जाहिराती करुन सरकार प्रसार माध्यमे विकत घेवू पाहत आहे. मोदी सरकार पुन्हा निवडून न येण्याची काळजी कामगार वर्गाने घ्यावी ही येत्या काळाची व देशाची गरज असल्याचे आवाहन कानगो यांनी केले. कामगार नेते एम. बी. रोहम, एस. डी. गोडसे, टी. ए. खराडे यांनी सभेत मार्गदर्शऩ केले. प्रास्ताविक व्ही. व्ही. कदम यांनी केले. एस. जी. सुळके, एन. आर. आकोटकर, एम. आर. कुंभार, ए. एम. रोहम, यु. टी. धर्मगुत्ते, आर. एल. घाडगे, एस. बी. चौधर यांनी संयोजन केले.
संघटनेची कार्यकारिणी जाहीर…
सभेमध्ये ग्रीव्हज कॉटन ऍण्ड अलाईड कंपनीज एम्प्लॉईज युनियनची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी भालचंद्र कानगो, उपाध्यक्षपदी एस. डी. गोडसे, आर. एम. डेमसे, एस. जी. सुळके, सरचिटणीसपदी एम. बी. रोहम, सहसरचिटणीपदी व्ही. व्ही. कदम,सचिवपदी टी. ए. खराडे, डी. पी. गायधनी, एस. बी. चौधर, खजिनदारपदी एम. आर. कुंभार, सहखजिनदारपदी के. एम. भांगरे, सदस्यपदी एन. आर. आकोटकर, ए. एम. गायकवाड, एस. व्ही. गोडसे, पी. आर. चौधरी, डी. एम. देवकाते, एस. आर. माने, टी. एन. गाडे, आर. बी. शिरसाठ, बी. बी. मांडे, आर. के. सावंडे, शिवा शेट्टी तसेच सभासदपदी ए. एस. कदम, के. एस वालकर, एल. एस. मारु, आर. एम. लोंढे, ए. एम. रोहम यांची निवड करण्यात आली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002