व्हीएस न्यूज – हातगाडी किंवा टपरीधारक अशा खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी व्यवसाय करताना स्वच्छतेला अधिक प्राधान्य दिल्यास व्यवसाय वृद्धी होईल, असा विश्वास अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अन्न विक्रेता विकास या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद केलेल्या शंभर विक्रेत्यांना परवाने व परन देण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस. एस. धुळे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशीनाथ नखाते, समिती सदस्य विजय शहापूरकर, अन्न सुरक्षा अधिकारी के. बी. जाधव, आर. जे. जेगटे, एल. एस. साळवे, आर. जी. नागवेकर, दिलीप करंजखेले आदी उपस्थित होते.
नारागुडे पुढे म्हणाले की, भविष्यात अन्न विक्रेता परवाने धारकास अन्न प्रशिक्षण घेणे बंधनकारक असणार आहे. ग्राहक हा तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्याकडे खाण्यासाठी येत असतो. त्यांना स्वच्छ व आरोग्यदायी खाद्यपदार्थ देणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. या बाबतीत जो कायद्याचे उल्लंघन करेल त्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी शेवटी दिला.
महासंघाचे अध्यक्ष नखाते म्हणाले की, नव्या युगात नव्या संकल्पनेचे आकलन करून संत गाडगे बाबांनी घालून दिलेल्या स्वच्छतेचा आदर्श समोर ठेवून आपली गाडी किंवा स्टॉल आपल्या घरासारखी स्वच्छ ठेवली पाहिजेत. आज आपल्या समोर मॉल संस्कृतीचे मोठ्या आव्हान आहे. त्यामुळे आपली बोलीभाषा व व्यावसायिक मांडणी यात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास आपण कटिबद्ध राहिले पाहिजे. अन्यथा मॉल संस्कृतीत आपले अस्तित्व धोक्यात येईल.
यावेळी सुमारे पाचशे खाद्य पदार्थ विक्रेते सहभागी झाले होते. सहभागी प्रशिक्षणार्थींना सहभागाबद्दल प्रमाणपत्रे देण्यात आले. यावेळी अन्न सुरक्षा अधिकारी धुळे यांनी दृकश्राव्याच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अस्मिता गायकवाड यांनी तर आभार दिलीप करंजखेले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साईनाथ खंडीझोड, कासीम तांबोळी, मनोज पाटील, किरण साडेकर, प्रकाश साळवे, नितीन भराटे, ओमप्रकाश मोरया, ज्ञानेश्वर बिरादार, तुकाराम माने, मधुकर वाघ, सुरेश देंड, मनीषा राऊत, सुनंदा चिखले, सलीम हवालदार, गोपाल अहीर, पोपट सकट, वहिदा शेख, तुकाराम माने यांनी परिश्रम घेतले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002