व्हीएस न्यूज - चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण निर्माण करणारा, लक्ष लक्ष दिव्यांनी आसमंत उजळून टाकणारा, सर्वत्र प्रकाश, फटाक्यांची आतषबाजी, पंचपक्वानांची गोडी आणि नात्या-नात्यांमध्ये स्नेह व मैत्रीची मधुरता वाढविणारा दीपोत्सवाचा सण आता केवळ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालेल्या बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेल्या आहेत.
बालचमूंकडून किल्ले बांधकामाची लगबग सुरू झाली आहे. सर्वांच्या घरा-घरांतील स्वच्छता आणि रंगरंगोटीची कामे अंतिम टप्प्यात असून दिवाळीचा फराळ बनविण्याची जोरदार तयारी महिलांनी सुरू केली आहे. आता मुलांना शाळांना सुटी मिळणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांसह सर्वांना आता उत्सवाचे वेध लागले आहेत. चिमुकल्यांनी किल्ले बांधकाम सुरू केले असून, सैन्य खरेदीसाठी तर त्यांचे आईबाबा त्यांना नवीन कपडे खरेदीसाठी बाजारपेठेत धाव घेत आहेत. उत्सवानिमित्तच्या मोठ्या आर्थिक उलाढालीसाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. आकर्षक आणि रंगीबेरंगी पणत्या रस्त्यांवर ठिकठिकाणी विक्रीसाठी मांडल्या आहेत. दुकानांबाहेर लटकणारे छोट्या-मोठ्या आकारातील रंगीबेरंगी आकाशकंदील, तोरण, रांगोळ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे बाजारपेठा इंद्रधुष्यासारख्या दिसत आहेत.
आधी मातीच्या साध्या रंग नसलेल्या पणत्या असायच्या मात्र, काही वर्षांपासून मातीच्याच पण नव-नवीन आणि विविध रंगांतील आकर्षक पणत्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे मातीच्या पणत्यांबरोबरच पेटवल्यानंतर सुगंध आणि सुवास पसरवणाऱ्या फॅशनेबल पणत्या ग्राहकांना भुरळ पाडत आहेत. ग्रीन, ऍपल, लेमन, स्ट्रॉबेरी अशी त्या नवीन बाजारात आलेल्या पणत्यांची नावे आहेत. शहरातील ठराविक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या या पणत्यांच्या किंमती ५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहेत. बारामतीत भिगवण चौक, मंडई व दुकानांमध्ये या रंगेबेरंगी पणत्या उपलब्ध आहेत.
आकाश कंदिलांच्या किमती वाढल्या…
दरवर्षीप्रमाणे बाजारपेठांमध्ये आकाश कंदिलांचा झगमगाट आहे. यंदाही आकाश कंदिलांमध्ये नवीन प्रकार पाहायला मिळत आहेत. साध्या पातळ व जाड रंगीबेरंगी कागदापासून बनविलेले, प्लास्टिकचे तसेच कापडी आकाशकंदील सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. यावेळी आकाश कंदिलांमध्ये नवीन प्रकार दिसत आहेत,सजावटीसाठी वापरले जाणारे छोट्या आकारांतील आकाश कंदील ५ रुपयांना मिळत आहेत. तर इतर प्रकारांतील आकाश कंदिलांच्या किमती साधारणपणे २५ रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत आहेत. यावर्षी २० ते २५ टक्क्यांपर्यंत किमती वाढल्या आहेत.
किराणा मालांच्या दुकानांमध्ये गर्दी…
दिवाळी म्हटले की, पंचपक्कवानांचा फराळ आलाच. लाडू, करंजी, चकल्या, शंकरपाळ्या, अनारसे, चिवडा या प्रमुख पदार्थांबरोबरच इतर अनेक पदार्थांची फराळात रेलचेल असते. हे पदार्थ बनविण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी सध्या ग्राहकांनी किराणा मालाच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी केली आहे. रवा, तेल, साखर, मैदा, पोहे, चना डाळ, खोबरे या वस्तुंच्या किमतींही गगनाला भिडल्या आहेत.
रंगीबेरंगी तोरण, हार, फुलमाळा…
बाजारात यंदा ग्राहकांना आकर्षित करतील असे तोरण, हार दिसत आहेत. गृहसजावटीसाठी महिला तोरण, हार, नकली फुलमाळा यांना अधिक महत्त्व देतात. त्यामुळे जरी त्यांच्या किंमतीत वाढ जरी झाली तरी घर सुंदर बनवण्याच्या दृष्टीने ग्राहक फुल माळा, तोरण यांना अधिक पसंती देत आहेत.
लहान मुलांना परीक्षा संपून आता सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे मुलांनी किल्ले बनवण्यास सुरुवात केली आहे. तसेच त्यांनी बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी लागणारे सैन्य बाजारात उपलब्ध झाले आहेत. ते घेण्यासाठी मुले गर्दी करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002