व्हीएस न्यूज - आपल्या दिलखेच अदाकारीने आणि नृत्याविष्काराने लावणी रसिकांना घायाळ करणार्या आणि राज्यातील तमाम लावणी रसिकांवर गेली अनेक दशके अधिराज्य गाजविणार्या ज्येष्ठ तमाशा कलावंत, लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे यांना कलेतील योगदानाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सोमवारी दिल्ली येथील शानदार समारंभात ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी नागपूर जिल्ह्याचे डॉ. महादेवराव मेश्राम आणि कोल्हापूरच्या मनोरमा कुलकर्णी यांनाही सन्मानित करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयाच्यावतीने दिल्लीतील विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात मंचावर राष्ट्रपती कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गहलोत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री क्रिष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, सचिव जी. लता कृष्णराव उपस्थित होत्या. सृजनशील कलेच्या क्षेत्रात मंगला बनसोडे यांना सन्मानित करण्यात आला. यावर्षी वयोश्रेष्ठ सन्मान हा विविध ११ श्रेणींमध्ये २२ लोकांना प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्र असे होते.
महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणार्या लावणी कलेतील एक आग्रगण्य कलाकार म्हणून मंगला बनसोडे यांचे नाव घेतले जाते. पणजोबा नारायण खुडे, आजोबा भाऊ नारायणगावकर, आई विठाबाई नारायणगावकर यांच्यापासून चालत आलेली लोककला जोपासत त्यांनी आपला मुलगा नितीनकुमार बनसोडे यालाही या कलेत उतरविले. या कलेत त्यांची पाचवी पिढी नितीन बनसोडेच्या रुपाने कार्यरत आहे.
तमाशा कलेतील मंगला बनसोडे यांचे आजोबा भाऊ बापू नारायणगावकर यांना १९६१ साली तात्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या आई विठाबाई नारायणगावकर यांना १९९० साली तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता मंगला बनसोडे यांना राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यामुळे कलेतील योगदानाबद्दल एकाच घरातील तिघांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे.
कलेच्या सेवेची पावती मिळाली - मंगला बनसोडे
पणजोबा, आजोबा, आई यांच्यापासून चालत आलेली कला जोपासण्याचे काम लहानपणापासून गेली साठ वर्षे करत आहे. मुलगाही आज कलेची सेवा करत आहे. आयुष्यभर कलेची जी निस्वार्थीपणे सेवा केली. त्या सेवेची पावती राष्ट्रपतींच्या हस्ते झालेल्या सन्मानाने मिळाली आहे. हा सन्मान माझा एकटीचा नाही. तो माझी आई, माझे संपूर्ण राज्यातील सहकारी कलाकार आणि मला डोक्यावर घेणार्या रसिक मायबापांचा आहे. या सन्मानामुळे धन्य झाल्यासारखे वाटते. आयुष्याच्या शेवटापर्यंत कलेची आणि रसिकांची सेवा करणार.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002