व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरीत ऐन थंडीत पावसाची रिमझिम पिंपरी-चिंचवडकरांना अनुभवायला मिळाली. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने थंडीत पावसाळी वातावरण तयार झाले.
मागील दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण होते. याचीच प्रचिती पावसाच्या स्वरूपात वरूण राजाने लावलेल्या हजेरीने दिसून आली. त्यामुळे वातावरणातही चांगलाच बदल झाला. पिंपरी,चिंचवड, आकुर्डी, रावेत, निगडी, प्राधिकरण भागासह पुणे आणि मावळमधील काही भागात सोमवारी दुपारनंतर पावसाने अचानक हजेरी लावली. भर हिवाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये पावसाचीच चर्चा रंगली. अचानक आलेल्या पावसाने वाहतुकीचा थोडा खोळंबा झाला. ऐन हिवाळ्याच्या दिवसात अचानक पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य होत आहे.
सलग तीन ते चार तास पावसाची रिमझिम सुरू होती. सायंकाळी कार्यालयीन कामकाज सुटण्याच्यावेळी देखील पाऊस सुरू राहिल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे तापमानातही चांगलाच मोठा बदल दिसून आला. कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस पहायला मिळाले. तीन आठवड्यानंतर तापमानाने दोन दिवसात उच्चांक गाठला.
हवामान खात्याने देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली होती ती खरी ठरली. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडल्या. आणखी दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या रविवार (दि. 26) पर्यंत हवामान ढगाळ राहण्याचाही अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002