व्हीएस न्यूज – महापालिकेच्या आरक्षित जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे थेरगाव येथील विकासाला खीळ बसली आहे. इच्छाशक्ती असताना देखील विकास साधता येत नसल्याची खंत नगरसेवकांनी व्यक्त केल्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी थेरगाव येथे जाऊन विविध आरक्षित जागांची पाहणी केली. अतिक्रमणे हटविण्याचे आदेश ग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले आहेत. सर्व आरक्षणे ताब्यात घेऊन तातडीने विकसित केली जातील, असेही आश्वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिले.
थेरगाव परिसर प्राधिकरणाच्या हद्दीत असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून या भागातील विकास दुर्लक्षीत राहिली आहे. सर्व्हे क्रमांक 33 मधील बस डेपोचे80 गुंठे जागा, सर्व्हे क्रमांक 36, 37 मधील खेळाच्या मैदानाची सुमारे तीन एकर जागा, सर्व्हे क्रमांक 32 आणि 33 पैकी या जागेतील प्रस्तावित उद्यानासाठी अडीच एकर जागा आरक्षित आहे. त्याचबरोबर कुणाल रेसिडन्सी ते थेरगाव स्मशानभूमी 12 मीटरचे दोन रस्ते प्रस्तावित आहेत. संबंधित जागा मालकांचा ताबा देण्यास विरोध असल्यामुळे आरक्षणे विकसित करण्यात अडथळे येत आहेत. या जागेची पाहणी करून आरक्षणे ताब्यात घेण्याकरिता जागा मालकांना विश्वासात घेण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना स्थानिक अपक्ष नगरसेवक कैलास बारणे यांनी पत्र दिले होते.
त्यावर आयुक्त हर्डिकर यांनी थेरगाव परिसरात जाऊन आरक्षित जागांची पाहणी केली. त्यातील काही जागांवर पत्राशेडचे अतिक्रमण हटवण्याचे आयुक्तांनी ग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर आरक्षीत जागा ताब्यात घेण्यासाठी लवकरच जागा मालकांसोबत बैठक घेऊन प्रश्न सोडवला जाईल. लवकरात लवकर आरक्षणे विकसित केली जातील, असे हर्डीकर यांनी सांगितले. तर, जागा मालकांना योग्य मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, असे नगरसेवक कैलास बारणे यांनी सांगितले. यावेळी नगररचना विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेडी, सव्हेअर सुहास शिंदे, उपअभियंता सुनील बागवानी, कनिष्ठ अभियंता राजेंद्र जगताप, नितीन निंबाळकर आदी उपस्थित होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002