वाहतूक विभागाची नवी नियमावली जारी
व्हीएस न्यूज – वाहतूक विभागाकडून टोईंगबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. या नियमावलीमध्ये अनेक नव्या नियमांचा अंतर्भाव करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.
नुकतीच मुंबईतील मालाड परिसरात महिला आणि तिचा लहान मुलगा कारमध्ये असताना वाहतूक पोलिसांकडून त्यांची गाडी उचलून नेण्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. सुरुवातीला ही गोष्ट समोर आल्यानंतर वाहतूक पोलिसांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले होते. मात्र, काही दिवसांतच या घटनेची दुसरी बाजू दाखवणारा व्हिडिओ समोर आला. यामध्ये संबंधित महिलेची चूक असल्याचेही स्पष्ट झाले.
त्यामुळे भविष्यात असा कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी वाहतूक विभागाकडून टोईंगबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक नव्या नियमांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. एखादे वाहन उचलत असताना त्या वाहनाचा मालक तेथे आल्यास दंडाची रक्कम आणि टोईंग शुल्क आकारून ते वाहन सोडण्यात यावे. तसेच गाडी टो करण्यापूर्वी ध्वनिक्षेपकावरून गाडी काढण्यासाठी एकदा सूचनाही देण्यात येणार आहे.
याशिवाय, एखादी गाडी नो-पार्किंग क्षेत्रात उभी असेल, पण गाडीचा चालक आतमध्ये बसला असेल तर ती गाडी उचलू नये. तसेच या गाडय़ा उचलण्यासाठी पोलिसांना मदत करणा-या कर्मचा-यांनी संबंधित वाहनाच्या मालकाशी गैरवर्तन किंवा उद्धटपणे वागू नये, असे या परिपत्रकात म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002