व्हीएस न्यूज - गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. या विजयाचा पिंपरी चिंचवड शहर भाजपच्यावतीने मोठा जल्लोष करण्यात आला. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पदाधिकार्यांनी पेढे वाटून आनंद साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. तर महिला पदाधिकार्यांनी फुगडी खेळून विजयोत्सव साजरा केला.
यावेळी महापौर नितीन काळजे, उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला अध्यक्षा शैलजा मोळक, प्रदेश सदस्या उमा खापरे, सरचिटणीस प्रमोद निसळ, अमोल थोरात,नगरसेवक शत्रुघ्न काटे, तुषार कामठे, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, विलास मडिगेरी, माऊली थोरात, शैलेश मोरे, उत्तम केंदळे, नामदेव ढाके, सागर गवळी, नगरसेविका कमल घोलप तसेच कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - प्राधिकरण, निगडी, यमुनानगर, साईनाथनगर या भागातील तब्बल सात हजार घरे स्वत:च्या मालकीचे असतानाही ती केवळ रेड झोनच्या हद्दीत येत असल्याने त्यांना राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर असूनही रहिवाशांना कर्ज मिळत नसल्याने आर्थिक कुंचबणा होत आहे. त्यात प्राधिकरणही कर्जासाठी ‘ना हरकत दाखला’ देत नसल्याने रहिवाशी आर्थिक कात्रीत सापडले आहे. या नागरिकांना ना हरकत दाखले देण्याची मागणी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली आहे.
याप्रकरणी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत मोटे यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सचिन चिखले म्हणाले, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण विकास प्राधिकरणाच्या हद्दीत सदर भाग येतो. सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या प्राधिकरणाने भूखंडावर स्वत: बांधकाम करून इमारती विकल्या आहेत. प्राधिकरण स्थापन झाल्यापासून सुमारे ४५ वर्षे या परिसरामध्ये अनेक रहिवाशी राहत आहेत. त्यातील असंख्य रहिवासी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना मुले-मुलीचा विवाह, परदेशात जाणे, इतर कारणांसाठी आर्थिक रक्कमेची गरज भासते. मात्र, त्यासाठी कर्ज देण्यास राष्ट्रीयकृत बँका स्पष्ट नकार देत आहेत.
प्राधिकरण, निगडी, यमुनानगर, साईनाथनगर परिसरातील घर मालकांना ही समस्या भेडसावत आहे. त्यांची घरे ४५ वर्षे जुनी असताना सन १९९८-९९ मध्ये रेड झोन हद्दीचा प्रश्न समोर आला. यामध्ये संबंधित रहिवाशांचा कोणताही दोष नाही. तरीही, त्यांना बँका कर्ज नाकारत असल्याने त्यांची आर्थिक कुंचबणा होत आहे, असे चिखले यांनी सांगितले. मोटे यांनी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे सदर प्रकरण सादर करणार असल्याची ग्वाही दिल्याचे,सचिन चिखले यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहरप्रमुख युवराज भगवान दाखले यांनी तयार केलेल्या जानेवारी २०१८ नविन वर्षे दिनदर्शिका प्रकाशन शिवसेना नेते खासदार संजयजी राऊतसाहेब यांच्या शुभ हस्ते मुंबई या ठिकाणी करण्यात आले यावेळी राऊत साहेबांनी दिनदर्शिकेचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या .
यावेळी जेष्ठ निष्टावंत शिवसैनिक किशोर पाटील , शिवसेना प्रणित शिवव्यापारीसेना शहर प्रमुख युवराज दाखले , उपशहरप्रमुख गणेश आहेर ,चिंचवड विधानसभा प्रमुख निलेश भोरे, उपविधानसभा प्रमुख राज श्रीमंत गिरी ,शिवसैनिक रोहीदास तांबे आदी उपस्थित होते .
व्हीएस न्यूज - गुजरात निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळेल, असे अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहेत. मात्र भाजपाचे सहयोगी सदस्य असलेले खासदार संजय काकडे यांनी उलट अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या विधानाने पक्षाची प्रतिमा मलीन झाली असून जनमत भाजपाविरोधात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे खासदार संजय काकडे यांचे निलंबन करून भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
अमोल थोरात यांनी याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसेच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. थोरात यांनी म्हटलयं की, गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळेल असे अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहेत. मात्र पुण्यातील भाजपचे सहयोगी सदस्य असलेले खासदार संजय काकडे यांनी या उलट अंदाज वर्तविला आहे. गुजरातमध्ये बहुमत तर सोडा अपक्षांसह अन्य पक्षांची मदत घेऊनही सत्ता स्थापन करता येणार नाही, असे भाकित वर्तविले आहे. संजय काकडे यांच्या या भाकितामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे. यापूर्वीही काकडे यांनी या प्रकारे भाकिते वर्तवून भाजपला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले आहेत. येनकेन प्रकारे प्रसिध्दीच्या झोतात राहण्याचा संजय काकडे यांचा सातत्याने प्रयत्न असतो, त्यामुळेच काकडे अशी वादग्रस्त विधाने करतात. काकडे यांच्या या विधानामुळे भाजपची प्रतिमा डागाळत असून, जनमत भाजपविरोधात जाण्याची शक्यता आहे. भाजपचे देशभरात उत्कृष्ट काम सुरू आहे. त्यामुळे भाजपकडे मतदारांचा ओढा आहे. असे असताना संजय काकडे भाजपविरोधी भाकिते वर्तवित आहेत. त्यामुळे संजय काकडे यांचे निलंबन करून भाजपमधून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी अमोल थोरात यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - दुर्गम भागातील, आदिवासी, वाड्यावस्तीवरील नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे. सरकारच्या आरोग्य विषयक सेवा सवलतींचा लाभ शेतक-यांना मिळावा. यासाठी डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील व्यवस्थापन नेहमी पुढाकार घेत असते. त्यांच्या सहयोगाने विश्व श्रीराम सेनेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांचा आरोग्य जीवनस्तर उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. असे प्रतिपादन विश्व श्रीराम सेना सामाजिक संघटनेचे अध्यक्ष लाल बाबू गुप्ता यांनी केले.
शनिवारी (दि. 16 डिसेंबर) विश्व श्रीराम सेना आणि डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चाकण जवळील पिंपरी बुद्रुक येथे राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी डॉ. मनोज तिवारी, डॉ. दिपक कोलते, पंचायत समिती सदस्य कैलास गाळव, गोसासी गावचे सरपंच नारायण पुरी, विश्व श्रीराम सेना आरोग्य मंचचे अध्यक्ष अक्रम शेख, माजी सरपंच संतोष गोरडे, मच्छींद्र भुजबळ,प्रमोदकुमार गुप्ता, नवनाथ हुंडारे, गणेश वाळूंज, आदित्य कुमार, विवेक भुजबळ आणि डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील स्टाफ आदी उपस्थित होते.
पिंपरी बुद्रुक गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी आणि बहुतांश ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब, हिमोग्लोबिन तपासणी, ईसीजी, बीएमआय, नेत्र तपासणी, दंत रोग तपासणी,अस्थिरोग, त्वचा रोग आणि स्त्रीयांच्या आजारांची तपासणी करण्यात आली. या शिबीराचा 397 नागरिकांनी लाभ घेतला. या तपासणी शिबीरानंतर 23 रुग्णांना पिंपरीतील डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यलयात मंगळवारी पुढील मोफत उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. यासाठी जाण्या - येण्याची व्यवस्था डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयाने केली आहे. स्वागत सरपंच नारायण पुरी, सूत्रसंचालन मच्छिंद्र भुजबळ आणि आभार अक्रम शेख यांनी मानले.
व्हीएस न्यूज - शहर स्वच्छ, सुंदर तसेच शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी सर्व महिला भगिनींनी स्वच्छता अभियानात सहभागी होवून केंद्रशासनाने विकसित केलेला स्वच्छता अॅप मोबाईलवर डाऊनलोड करून सहकार्य करावे. हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात अग्रमानांकित होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छसर्वेक्षण २०१८ मध्ये नागरिकांचा सहभाग घेण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्यांतर्गत सिमा सावळे यांच्या पुढाकाराने महिला प्रशिक्षकांची कार्यशाळा घेण्यात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
स्थायी समिती सभापती सिमा सावळे म्हणाल्या, संसाराची गाडी महिला सक्षमपणे पुढे नेतात त्याचप्रमाणे शहर स्वच्छतेची गाडीही पुढे नेण्यासाठी सर्व महिलांनी सहकार्य करावे. आपण जबाबदार नागरिक म्हणून स्वच्छता अॅप डाऊनलोड करावा. त्या माध्यमातून शहरातील स्वच्छता विषयक समस्या महापालिकेकडे पाठवता येतील व त्यावर महापालिका २४ ते ४८ तासात कार्यवाही करेल असेही, त्या यावेळी म्हणाल्या. महिला ज्या ठिकाणी काम करतात त्याही ठिकाणी कचरा पडलेला असतो परंतु सजग नागरिक म्हणून आपण ही बाब महापालिकेच्या लक्षात आणून द्यावी. महापालिकेचे स्वच्छता दूत म्हणून सर्वांनी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्वच्छता अॅप सर्वाधिक डाऊनलोड करून या मोहिमेत सहभागी होणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येईल. पिंपरी चिंचवड शहराचा या स्वच्छ सर्वेक्षणातील मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यामध्ये अग्रक्रम आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. व सर्व महिलांच्या प्रयत्नाशिवाय हि मोहीम यशस्वी होणार नाही. या शहरामध्ये निरोगी वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असून ते आवाहन पेलण्यासाठी हातात हात घालून काम करू असेही श्रीमती सावळे म्हणाल्या. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, स्वच्छतेमध्ये महिलांचा सहभाग आवश्यक आहे. स्वच्छते बरोबरच डिजिटल साक्षरता महत्वाची असून महिलांनी त्यामध्ये पुढे यायला हवे. ती आजच्या काळाची गरज आहे. गरिबीतून बाहेर येण्यासाठी आरोग्य निरोगी राखणे गरजेचे आहे. गरीब महिलांना त्यांचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी व त्याची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारचा स्वच्छता अॅप महत्वाचा आहे. त्यामुळे कचरा, ड्रेनेज, सह स्वच्छता विषयक तक्रारी घरबसल्या करता येणार आहेत. त्याचे निराकरण महानगरपलिका २४ ते ४८ तासात करणार असून त्यासाठी सर्व महिलांनी आपल्या मोबाईल मध्ये स्वच्छता अॅप डाऊनलोड करवा, असे आवाहनही आयुक्त श्री. हर्डीकर यांनी केले. स्वच्छता अभियान हे शहरातील तळागळापर्यंत घेऊन जाण्यासाठी सर्व महिलांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. स्वच्छता अॅप डाऊनलोड करण्याबाबतची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. नगरसदस्या आशा धायगुडे-शेंडगे म्हणाल्या, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून स्वच्छता विषयक काम करावे. महिलांनी ठरवले तर त्या कोणतेही कार्ये यशस्वी करू शकतात. परिसराप्रमाणे शहर स्वच्छ असायला हवे हि भावना सर्वांमध्ये निर्माण होत आहे. महानगरपलिकेचे कर्मचारी कचरा संकलनासाठी घरोघरी येत आहेत तेव्हा ओला व सुका कचरा वेगेवेगळा करून त्यांना द्यावा व शहर स्वच्छता मोहीमेमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले तर सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002