पिंपळे गुरव येथे महापालिकेच्या इमारतीत अनधिकृत अनाथालय
पिंपळे गुरव
2017-12-18
व्हीएस न्यूज - पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या सांस्कृतिक भवनात अनधिकृतपणे अंध, अनाथ केंद्र सुरू असून या केंद्रातील मुले अनाथ नाहीत. संस्थाचालक मुलांच्या पालकांकडून फी घेत आहेत. त्यामुळे महापालिकेने ही इमारत मोकळी करून ताब्यात घ्यावी, अशी तक्रार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी शनिवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
जगताप यांनी आपल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, पिंपळे गुरव येथे महापालिकेने बांधलेल्या इमारतीत सध्या तुषार कांबळे हे ममता अंध अनाथ केंद्र चालवीत आहेत. या केंद्रातील मुले अनाथ नसून त्यांना पालक आहेत. या पालकांकडून सदर संस्था फी घेत आहे. त्याचबरोबर परिसरातील प्रतिष्ठीत व्यक्तींना भावनिक आवाहन करून आर्थिक व वस्तू स्वरुपात मदत घेऊन स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जात आहे. काही भाजपा नेते आणि नगरसेवक यांना हाताशी धरून त्यांच्यामार्फत या सांस्कृतिक भवनाचा गैरवापर केला जात आहे. या संस्थेकडून महापालिकेस कोणतेही आर्थिक उत्पन्न दिले जात नाही. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे या संस्थेची चौकशी करून ही इमारत महापालिकेने आपल्या प्रशासकीय कामासाठी वापरात आणावी अथवा सदर संस्थेस कायदेशीर करार करून भाडेतत्वावर वापरण्यास द्यावी. संस्थेत शिकणाऱ्या मुलांबाबत आपले काही मत नाही परंतु या विद्यार्थ्यांच्या नावाखाली जो गैरकारभार सुरू आहे त्याला पायबंद घालावा अशी मागणी जगताप यांनी आयुक्तांकडे केली आहे.