व्हीएस न्यूज - लोकसभेच्या निवडणुका २०१९ मध्ये होत आहेत. यावेळी देशाची धुरा राहुल गांधी याच्याकडे जाणार का मोदींकडे कायम राहणार अशी चर्चा जोर धरू लागली असतानाच सोशल मिडीयावर भारताच्या अंडर १९ क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद भूषविलेल्या राहुल द्रविड यालाच पंतप्रधान बनवावे अशी मोहीम सुरु झाली आहे. अंडर १९ संघाला चौथ्यावेळी वर्ल्डकप विजेता बनविण्यात उत्तम कामगिरी बजावलेला तसेच खात्रीचा फलंदाज, संकटहरण कर्ता, द वॉल अश्या नावानी प्रसिद्ध असलेला राहुल त्याने नुकत्याच दाखविलेल्या दिलदारी आणि न्यायी वृत्तीमुळे एकदम प्रकाशात आला आहे आणि त्याच्यावर फॅन्सकडून स्तुती सुमनांचा वर्षाव होऊ लागला आहे. भारताच्या ज्युनिअर टीम ने वर्ल्डकप जिंकल्यावर बीसीसीआयने राहुलला ५० लाखाचे इनाम जाहीर केल्यानंतर मोह सोडून राहुलने या विजयात खेळाडू, सहप्रशिक्षक असे सर्वांचे समान योगदान आहे तेव्हा बक्षिसाची रक्कम सर्वाना समान हवी असे सांगितले आणि बीसीसीआयने ते मान्य करून सर्वाना २५-२५ लाख रुपये दिले. गायक संगीतकार विशाल ददलानी यांनी राहुल द्रविड पंतप्रधान पदासाठी अतिशय योग्य असल्याचे ट्वीट केले मात्र, याला दुजोरा देण्यासाठी फॅन्सनी प्रतिक्रियांचा पाउस पडला आहे. कर्नाटक दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनीही राहुल द्रविडचे कौतुक करताना इमानदारी म्हणजे काय आणि दुसऱ्यांसाठी कसे जगायचे याचा आदर्श राहुलने घालून दिल्याचे सांगितले होते. तर राहुल द्रविड ने भारतीय ज्युनिअर संघाच्या विजयाचे सर्व श्रेय मला दिले गेले यामुळे लाजिरवाणे वाटल्याचे सांगताना या यशात सपोर्ट स्टाफ आणि खेळाडू याचाही तितकाच वाटा असल्याचे स्पष्ट केले होते. राहुल द्रविडच्या या भूमिकेचे सर्वांनाच कौतुक वाटले होते
व्हीएस न्यूज – वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांना बुधवारी चेन्नईत आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटक करण्यात आली. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी कार्ती लंडनहून आल्यानंतर सीबीआयने त्यांना चेन्नई विमानतळावरून अटक केली. त्यांना यानंतर न्यायालयात सादर करण्यात येण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी १५ मे रोजी सीबीआयने पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कार्ती यांना आयएनएक्स मीडिया मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ठोस पुरावा मिळाल्यानंतर अटक करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कार्ती यांच्याशी संबंधित एका ठिकाणावर अलीकडेच छापा टाकण्यात आला. त्यानंतर कार्ती यांचे लेखापरीक्षक भास्कररामन यांना चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत १६ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने भास्कररामन यांना चौकशीसाठी १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी दिली.
पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना कार्ती यांनी आयएनएक्स मीडियाला परदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाची (एफआयपीबी) परवानगी मिळवण्यासाठी बेकायदेशीरपणे ३.५ कोटीचे सेवा शुल्क आकारल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी चिदंबरम काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री होते. या खटल्यात सीबीआयने कार्ती यांच्या परदेशात जाण्यावर बंदी घातली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर ही बंदी उठवण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज – एमआयएम अध्यक्ष असदउद्दीन ओवेसी यांच्यावर बाबरी मशीद प्रकरणी केलेल्या विधानाविरोधात केंद्रिय मंत्री गिरीराज सिंह यांनी तोफ डागत मोहम्मद अली जिनाच्या भुताने अशाप्रकारच्या लोकांना झपाटले असून यांचा देशाचे तुकडे करणे हाच हेतू असल्याचा आरोप केला.
ओवेसी यांनी अयोध्येत बाबरी मशीद पुन्हा एकदा उभारू व सर्वोच्च न्यायालय मुस्लिमांच्या बाजूने निकाल देईल असे विधान केल्यानंतर सिंह यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. भारतातील मुस्लिम बाबरचे वंशज किंवा विदेशी नागरिक नाहीत. भगवान रामाचे ते वंशज आहेत. आमची पूजेची पद्धत वेगळी असली तरी आमचा उगम एक आहे. पण मोहम्मद अली जिनाचे भूत ओवेसीसारख्या लोकांच्या हृदयात शिरले आहे. म्हणूनच ते देश तोडण्याच्या मागे लागले आहेत. ते मक्का-मदिन्याला जाऊ शकतात. पण आम्ही कोठे जावे ? राम मंदिर काय पाकिस्तानात बांधायचे का ?” असा सवाल सिंह यांनी केला.
व्हीएस न्यूज – भारतीय संघाची श्रीलंकेत ६ मार्चपासून सुरू होणाऱ्या तिरंगी टी-२० मालिकेसाठी घोषणा करण्यात आली असून विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार, बुमराह, हार्दिक पंड्या या पाच महत्वाच्या खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. सलामवीर रोहित शर्माकडे कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर त्याचाच जोडीदार शिखर धवनकडे उपकर्णधारपद सोपवले आहे.
दिनेश कार्तिक व ऋषभ पंत असे दोन पर्याय यष्टीरक्षक म्हणून संघात ठेवण्यात आले आहेत. या टी-२० मालिकेतील तिसरा संघ बांगलादेशचा आहे. मालिकेतील सर्व सामने श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत. निदाहास ट्रॉफीसाठी संघ निवडताना खेळाडूंवरील ताण आणि भविष्यातील खेळाचे वेळापत्रक लक्षात घेतले आहे. वेगवान गोलंदाजाना दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यापेक्षा त्यांची कामगिरी चांगली होण्यासाठी त्यांना योग्य विश्रांती देणे गरजेचे आहे. असे निवड समितीचे अध्यक्ष एम.एस.के प्रसाद म्हणाले. विश्रांतीची विनंती धोनीने केल्यामुळे त्याची निवड करण्यात आली नसल्याची माहिती एम.एस.के प्रसाद यांनी दिली. संघात कर्नाटकचा फलंदाज लोकेश राहुलसह ऋषभ पंत, दीपक हुडा आणि विजय शंकर यांना स्थान देण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर आणि बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजीची जबाबदारी जयदेव उनाडकट व शार्दुल ठाकूर या वेगवान गोलंदाजांवर असेल. तसेच मोहम्मद सिराज, विजय शंकर हे मध्यमगती गोलंदाजीचे पर्याय संघात आहेत. फिरकीपटू यादवच्या गैरहजेरीत वॉशिंग्टन सुंदरवर मोठी जबाबदारी असेल. भारत, श्रीलंका आणि बांगलादेशदरम्यान होणाऱ्या तिरंगी मालिकेतील पहिला सामना भारत-श्रीलंका संघात ६ मार्चला होईल. श्रीलंकेच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त निदाहास ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज – नीरव मोदी, मेहुल चोकसीनंतर आता सीबीआयने देशातील आणखी एका सरकारी बँक असलेल्या ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे (ओबीसी) ९७ कोटी रूपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी सिंभोली शुगर लि.चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक गुरमीतसिंग मान, उपसरव्यवस्थापक गुरूपालसिंग आणि अन्यविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सीबीआयने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणांवर छापा टाकला असून याबाबत माध्यमांना मिळालेल्या वृत्तानुसार, २०१७ मध्ये ७४.९८ कोटी रूपयांचे नुकसान उत्तर प्रदेशची कंपनी सिंभोली शुगर लि.ने दाखवले होते. तर यापूर्वी डिसेंबर २०१६च्या तिमाहीत कंपनीचे १८.०९ कोटी रूपयांचे नुकसान झाले हेाते. त्यात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ही कंपनी सूचीबद्ध असून देशातील सर्वांम मोठ्या साखर उत्पादकांपैकी एक आहे. सीबीआयने कंपनीवर सरकारी बँकांचे कर्ज चुकवले न गेल्यामुळे छापे टाकले आहेत. ओबीसी बँकेकडून सिंभोली शुगर लि.ने १०९.०८ लाख कोटींचे कर्ज घेतले आहे. सीबीआयने बँकेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला असून कंपनीच्या दिल्ली, हापूड आणि नोएडा येथील आठ ठिकाणांवर सीबीआयने छापे मारले. सीबीआयने याप्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे. कर्ज देणाऱ्या अधिकाऱ्यांसह अनेक लोकांची भूमिका तपासली जात आहे.
व्हीएस न्यूज – मुंबई उच्च न्यायालयाने आधारकार्ड रेशन कार्डला जोडणे अनिवार्यच असल्याचे म्हटले असून बायोमेट्रिक रेशन कार्ड धारकांनाच १ मार्चपासून स्वस्त दरात धान्य उपलब्ध होणार असल्याने आता आधारकार्ड रेशन कार्डशी जोडावे लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ता अझीझ पठाण यांच्याकडून यासंदर्भातील विरोध करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने जी निकाली काढताना दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. बायोमेट्रिक पद्धतीने रेशनिंग धान्य देण्याचा कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात आला आहे. रेशनकार्ड धारकांना यासाठी त्यांचा आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडावा लागणार आहे. पण यात मोठ्या चुका होत असून गरज नसतानाही आधारची सक्ती करणे योग्य नसल्याचे म्हणत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. राज्यभरात या संदर्भात अनेक ठिकाणी माहितीचे संगणकीकृत करताना चुका झाल्याच्या तक्रारी आल्याचे म्हटले होते. एकट्या नाशिकमध्ये चुकीची माहिती अपलोड झालेल्या शिधापत्रिका ७४ हजारांच्यावर असल्याचेही या याचिकेत म्हटले होते. या संदर्भात पालकमंत्र्यांकडे तक्रार करूनही तोडगा निघाला नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - पंजाब नॅशनल बँकेतील 11401 कोटी रुपयांचा घोटाळा अद्याप विस्मरणात गेलेला नाही, तोच या बँकेतील आणखी एक घोटाळा समोर आला आहे. या बँकेतील तब्बल 10 हजार खातेदारांचा क्रेडिट आणि डेबिट कार्डचा माहितीसाठा लिक झाला असल्याचा दावा एका वर्तमानपत्राने केला आहे.
हाँगकाँगमधील एशिया टाईम्स या वर्तमानपत्राने एका तज्ज्ञाच्या हवाल्याने यासंबंधातील बातमी छापली आहे. या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार, पीएनबीच्या खातेदारांची क्रेडिट व डेबिट कार्डची अत्यंत गोपनीय माहिती गेल्या 3 महिन्यांपासून एका संकेतस्थळावर विकली विक्री व विकत घेतली जात होती.
क्लाऊडसेक या कंपनीने बुधवारी पीएनबीला ही माहिती दिली, असेही या बातमीत म्हटले आहे. क्लाऊडसेक ही सिंगापूरमध्ये नोंदणी झालेली कंपनी असून तिचे एक कार्यालय बंगलोर येथेही आहे. ही कंपनी बेटाच्या खरेदी-विक्रीवर नजर ठेवते. पीएनबीशी संबंधित देशातील सर्वात मोठा बँकिंग घोटाळा अलीकडेच उघडकीस आला आहे. त्यावर कारवाई चालू असतानाच ही नवीन माहिती उघड झाल्यामुळे बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे.
व्हीएस न्यूज - आपल्या मोठ्या मुलाच्या आजारासाठी पैशांची गरज असलेल्या मातेने आपल्या नवजात अर्भकाला विकले असल्याची घटना झारखंडमध्ये समोर आली आहे.
धनबाद जिल्ह्यात ही घटना घडली आहे. न्यूज18 या संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, जिल्ह्यातील वासेपूर येथे राहणाऱ्या या महिलेला तिच्या सहा वर्षाच्या मुलाच्या उपचारासाठी 15 हजार रुपयांची गरज होती. परंतु ती व तिचे पती या रकमेची व्यवस्था करू शकले नाहीत त्यामुळे जावेद नावाच्या व्यक्तीने त्यांच्या दोन महिन्याच्या मुलाला विकत देण्याची सूचना केली सुरवातीला हीनाने या प्रस्तावाला नकार दिला, मात्र नंतर तिने होकार भरला त्यानुसार बिहारमधील गया येथील एका जोडप्याला हे अर्भक 20 हजार रुपयांमध्ये विकण्यात आले.
त्या जोडप्याने हे अर्भक घेतले व स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन त्याला दत्तक घेतले. त्यानंतर ते आपल्या गावी निघून गेले. मात्र काही दिवसांनी हीनाचे मातृत्व उसळून आले व तिने आपले बाळ परत मागितले. त्यासाठी तिने पैसे उधार घेतले. मुलाला परत आणण्यासाठी 20 ते 25 हजार रुपये द्यावे लागले तरी माझी तयारी आहे, असे तिचे म्हणणे आहे. यासंबंधात तिने धनबाद येथील न्यायालयातील एका वकिलाचा सल्ला घेतला आहे. विशेष म्हणजे भारतीय कायदा मुस्लिम वैयक्तिक कायदा यापैकी कोणत्याही कायद्यात मुस्लिमांना मूल दत्तक घेण्याची परवानगी नाही.
व्हीएस न्यूज - गेल्या २०१४ मध्ये सत्तेतून पाय उतार व्हावे लागलेले युपीए सरकारच हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणाला जबाबदार असून अशा काही महत्वपूर्ण कागदपत्रांवर त्याच सरकारने स्वाक्षऱ्या केल्यामुळे पंजाब नॅशनल बँक घोटाळा नीरव मोदी करू शकला, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते एका वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
फडणवीस म्हणाले, की पीएनबी बँकेच्या कथित ११ हजार ४०० रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेल्या नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी यांना सर्व लाभ कसे मिळाले ? मी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला तेव्हा आढळून आले, की मागच्या युपीए सरकारने सत्तेतून जाण्याच्या चार ते पाच दिवस आधीच, काही कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. यामुळेच नीरव आणि मेहूल हजारो कोटींचा घोटाळा करू शकले. कुण्याही घोटाळेखोराला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वस्थ बसू देणार नाही. नीरव मोदीला ते पुन्हा भारतात आणून न्यायालयासमोर उभे करतील, असेही फडणवीस म्हणाले.
व्हीएस न्यूज – ५ जी नेटवर्कची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्याची घोषणा चीनची तंत्रज्ञानविषयकची मोठी कंपनी हुवाई आणि भारती एअरटेलने केली असून एअरटेलच्या नेटवर्कद्वारे मनेसरमध्ये (गुरुग्राम) ही चाचणी घेण्यात आली. यावेळी ३ जीबीपीएसहून जादा स्पीड मिळाल्याचा दावा कंपनीने केला आहे.
याबाबत माहिती देताना भारती एअरटेलच्या नेटवर्कचे संचालक अभय सावरगावकर यांनी सांगितले, की ५ जीच्या इंटरऑपरेबिलीटी अॅण्ड डेव्हलपमेंट टेस्टींग तंत्रज्ञानाबाबत आम्ही वेगाने पुढे जात आहोत. आम्ही भागीदारासोबत रोबोटिक यंत्रणा तयार करत असून नुकत्याच घेतलेल्या चाचणीतून ३.५ गिगाहार्टझ ते १०० मेगाहार्टझच्या बॅंण्डविथची चाचणी घेतल्याचे कंपनीने म्हटले आहे. यावेळी एंड टू एंड नेटवर्क लॅटन्सी एक मिलिसेकंद नोंदविण्यात आली. ५ जीची चाचणी ही देशातील दूरसंचार क्रांतीत मैलाचा दगड ठरण्याची चिन्हे आहेत.
व्हीएस न्यूज - स्वप्नील जोशीला मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर आपला मानसपुत्र म्हणतात हे तर सगळ्यांनाच माहीत आहे. नुकतेच छोट्या पडद्यावर ते दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक या नात्याने एकत्र आले आहेत. गेली कित्येक वर्ष मानसपितापुत्रांच्या या जोडीने रसिक मनांवर अधिराज्य गाजवले. त्यांना पडद्यावर साकारलेल्या भूमिका नेहमीच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या.
सचिन पिळगांवकरांची आपल्या वैयक्तिक आयुष्यात जागा खास असून आपल्याला ते वडिलांच्या स्थानी असल्याचे म्हणणारा स्वप्नील जोशी आणि स्वप्नीलला मुलासारखे वागवणारे सचिन पिळगांवकर. पितापुत्राचे भावबंध खऱ्या अर्थी जपणारी ही जोडी आता पडद्यावर हे नाते साकारण्यास सज्ज झाली आहे. ही जोडी २००८ मध्ये आलेल्या ‘आम्ही सातपुते’ या चित्रपटातून पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली आणि यांचे अनोखं बाँडिंग पाहून प्रेक्षकही सुखावले. त्यानंतर आलेल्या काही गप्पांच्या कार्यक्रमात या जोडीच्या दिलखुलास गप्पांनी या दोघांमधील प्रेमळ नात्याची पोचपावती प्रेक्षकांना दिली.
तब्बल १० वर्षांनी आता हीच जोडी पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवणार आहे आणि त्यात विशेष म्हणजे मानसपितापुत्राची ही जोडी पडद्यावर पिता-पुत्राच्याच भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कोणता?या चित्रपटाची कथा काय? पितापुत्राची ही जोडी प्रेक्षकांसाठी नेमकं काय घेऊन येणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्त्यात असली तरी या जोडीला पडद्यावर एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरेल यात शंका नाही.
व्हीएस न्यूज – पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे माझे नेते नाहीत. मला ते व्यक्तिगत पातळीवर आवडतात. मला त्यांचे राजकारण आणि विचारही पटतात, पण ते माझे नेते नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ही प्रतिक्रिया मुंबई आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात दिली. त्याचबरोबर तर प्रियंका गांधी यांनी राजकारणात आले पाहिजे अशीही इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. देशाच्या राजकारणात प्रियंका गांधी यांची कधी एंट्री होणार याची वाट मी पाहतो असल्याचेही पटेल यांनी म्हटले आहे.
जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर या तिघांनीही गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधींच्या साथीने भाजपला काँटे की टक्कर दिली होती. तसेच पाटीदार समाजाचे प्रश्न मांडत हार्दिक पटेलने पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात शड्डू ठोकला होता. आता मात्र राहुल गांधी यांना मी माझे नेते मानत नाही असे स्पष्टीकरण हार्दिक पटेल यांनी दिले आहे. मी गुजरातच्या पाटीदार समाजाचच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केल्यानंतर मला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्या पाटीदार समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपला काँटे की टक्कर देऊ शकला कारण त्यांच्या साथीला हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर होते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002