व्हीएस न्यूज - पीडब्ल्युडीच्या कॉलनीत निवासस्थान बळकावून राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलाचे घर सील करण्यासाठी गेलेल्या मुकादमाला शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच 'तु काम करतो ते मी बघतो, तुला कोणास काय सांगायचे ते सांग' अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी सकाळी 11 वाजता सांगवीतील पीडब्ल्युडी कॉलनीत घडला.
पीडब्ल्युडीचे मुकादम विश्वनाथ साठे (वय-58, रा. आनंद पार्क, पिंपळे-गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश विजय गायकवाड (रा. पीडब्ल्युडी कॉलनी, डी 1/14 नवी सांगवी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत फौजदार एस. जी. पाटील यांनी माहिती दिली. योगेश गायकवाड याचे वडील पीडब्ल्युडीमध्ये कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांना नवी सांगवीतील पीडब्ल्युडी कॉलनीत घर मिळाले आहे. योगेश याने त्यांच्या घराशेजारील मोकळे असलेले घर बळकावून त्यात राहू लागला. याची माहिती मुकादम साठे यांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर त्याच्या वडीलांच्या पगारातून घराचे पैसे जमा करण्यात येऊ लागले. योगेशचे घर सील करण्यासाठी मुकादम साठे मंगळवारी पीडब्ल्युडी कॉलनीत कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी योगेशने साठे यांना शिवीगाळ करत धक्का-बुक्की केली. 'तु काम करतो ते मी बघतो, तुला कोणास काय सांगायचे ते सांग' अशी धमकी दिली. सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.