स्टिल उदयोगात विकासाच्या व रोजगारांच्या अनेक संधी - मनोज भुतानी
पिंपरी – चिंचवड
2017-12-23
व्हीएसन्यूज - भारतातील स्टिल उद्योगाला उज्ज्वल भविष्य आहे. भारतात दर मानसी स्टिलचा वापर दोन टक्के आहे. तर अमेरिकेसारख्या विकसित राष्ट्रात तीस टक्के दर मानसी स्टिल वापरले जाते. भारतात स्टिल उद्योगाची वार्षिक वाढ आठ टक्के आहे. स्टेनलेस स्टिलचा शंभर टक्के पुर्नवापर करता येतो. या उदयोगाला भारतात विकासाच्या व रोजगारांच्या अनेक संधी असल्याचे मत जिंदाल स्टिलचे महाराष्ट्र व्यवस्थापक मनोज भुतानी यांनी व्यक्त केले.
वसंत ग्रुप आणि जिंदाल स्टिल यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील स्टिल व्यापा-यांच्या परिसंवादाचे आयोजन चिंचवड येथे करण्यात आले होते. यावेळी वसंत ग्रुपचे संचालक प्रेमचंदजी मित्तल, अनिल मित्तल, रविंद्र लांबा, राजेंद्र मोकाशी, रविंद्र येवले आदींसह शहरातील स्टिल उद्योग व्यवसायाशी संबंधीत उद्योजक व्यापारी उपस्थित होते.
मनोज भुतानी म्हणाले की, भारताच्या विस्तिर्ण समुद्र किनारी भूप्रदेशात स्टिल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. या उद्योगात गुंतवणूक वाढल्यास लाखो उद्योगांना वाढीसाठी मदत होईल. यातून कोट्यावधी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. तसेच सरकारला हजारों कोटींचा महसूल मिळेल. यासाठी गुंतवणूकदारांनी व उद्योजकांनी स्टिल उद्योगात यावे. जिंदाल स्टिल चलणी नाणे निर्मितीसाठी रिझर्व बँकेला स्टिल पुरवठा करते. केंद्र व राज्य सरकारने नियम अनुकूल करुन पोषक वातावरण निर्मिती केल्यास मेक इन इंडियाचे स्वप्न साध्य होण्यास मदत होईल. असेही भुतानी म्हणाले.
स्वागत, प्रास्ताविक करताना अनिल मित्तल यांनी सांगितले की, वसंत ग्रुपची स्थापना 1981 साली प्रेमचंदजी मित्तल यांनी केली. पुण्यात सात आणि धारवाड येथे एक असे आठ प्रकल्प वसंत ग्रुपचे आहेत. नुकताच सोलर उद्योगात वसंत ग्रुपने प्रवेश केला आहे. आयएसओ 9000 प्रमाणीत हा ग्रुप असून यातून हजारों लोकांना रोजगार दिला आहे.