नवीन वर्षात तरी पिंपरी- चिंचवडला मंत्रिपद मिळणार का?
पिंपरी – चिंचवड
2017-12-29
व्हिएसन्यूज - राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन 3 वर्षे झाली. पिंपरी- चिंचवड महापालिकेत भाजपाचे आमदार तथा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीची 15 वर्षांची सत्ता घालवून भाजपची एकहाती सत्ता आणली, मात्र, अजूनही पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळाले नाही. आता 2017 संपत आले आहे. व 2018 ला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात तरी , पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळणार का? याबाबत शहरवासीयांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांची 15 वर्ष निर्विवाद सत्ता होती. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केला. आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडले. त्यानंतर, आमदार महेश लांडगे व माजी महापौर आझम पानसरे यांच्या मदतीने 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यामुळे, आता पिंपरी चिंचवड शहराला मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा पिंपरी- चिंचवडच्या नागरिकांना वाटू लागली.
मात्र, 2017 हे वर्ष संपत आले तरी आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांना मंत्रिपद मिळाले नाही. त्यामुळे, आता 2018 ला तरी पिंपरी- चिंचवड शहराला नवीन वर्षात मंत्रिपद मिळणार का? अशी आशा शहरातील नागरिकांना लागली आहे. ही, आशा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्ण करणार का? हे येणारे वर्षच ठरवेल.