न्यू इयर सेलीब्रेशन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर
पिंपरी – चिंचवड
2017-12-31
व्हिएसन्यूज - नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करताना हुल्लडबाजी करणाऱ्या तळीरामांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार येईल, असा इशारा शहर पोलीसांनी दिला आहे. तसेच शहरात शनिवारी मध्यरात्रीपासून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
न्यू इयरच्या पार्टीकरिता शहरातील विविध भागातील हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जोरदार तयारी सुरू आहे. वाहतूक नियमांचा भंग करत वेगात वाहने चालविणे, सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करणे अशा तळीरामांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बेदरकारपणे वाहने चालवितात. काही लोक धांगडधिंगा करुन सार्वजनिक शांतता भंग करतात. यासह खासगी बंगले, हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या यांच्यावर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 पोलीस उपायुक्त, 2 सहाय्यक आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 137 एपीआय-पीएसआय, 670 कर्मचारी, यांच्यासह याव्यतिरिक्त गुन्हेशाखेचे 1 पीआय, 2 एपीआय, 1 पीएसआय 25 कर्मचारी, शीघ्रकृतीदल तुकडी, दंगाकाबू पथक आदी फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
ड्रंक ऍण्ड ड्राईव्हची होणार कारवाई
शहरातील महत्वाच्या चौकासह विविध भागात वाहतूक पोलीसांच्या वतीने मद्य प्राशन करून वाहने चालविणाऱ्यांवर ब्रिथ ऍनालायझरव्दारे मशिनव्दारे ड्रंक ऍण्ड ड्राईव्हची कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये वाहन चालकांचा परवानाही रद्द केला जाईल, असा इशारा वाहतूक पोलीसांच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट घालून प्रवास करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.