... अन्यथा महिला बाल कल्याण समितीच्या बैठकीला हजर राहणार नाही
पिंपरी – चिंचवड
2017-12-31
व्हिएसन्यूज - महिला बालकल्याण समितीच्या बैठकीला अधिकारी हजर राहत नाहीत, सभापती, सदस्य बैठकीला येऊन ताटकळत बसतात. प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकरांना वारंवार फोन करूनही बैठकीला उपस्थित राहत नाहीत. मोबाईल बंद करून ठेवातात. महिला बालकल्याण समितीसाठी स्वतंत्र सहायक आयुक्त न दिल्यास पुढील बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचा इशारा सभापती सुनिता तापकीर यांच्यासह समितीच्या सदस्यांनी दिला आहे.
याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महिला व बाल कल्याण समितीची शनिवारी बैठक होती. या विभागाचा सहायक आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्तपदाकडील भांडार, उद्यान, शिक्षण, अग्निशामक यासह सुमारे दहा ते पंधरा विभागाचा कार्यभार आहे.
शहरातील महिलांसाठी महिला व बाल कल्याण विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. तसेच पुढील महिन्यात पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अष्टीकर महिला व बाल कल्याण समितीच्या विषयांना न्याय देवू शकत नाही. बैठकीला हजर राहू शकत नाहीत. त्यांना समितीच्या विषयांचे गांर्भीय नसेल तर त्यांच्याकडून या विभागाचा तात्काळ पदभार काढून स्वतंत्र सहायक आयुक्त नेमण्याची मागणी सभापती सुनिता तापकीर यांनी केली. अन्यथा पुढील बैठकीला सर्व सदस्य उपस्थित राहणार नसून आम्ही प्रशासनाचा निषेध करू, असा इशाराही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.