डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलगी दगावल्याचा आरोप; वडिलांकडून दवाखान्याची तोडफोड
पिंपरी – चिंचवड
2018-01-02
व्हिएसन्यूज - डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलगी दगावली असा आरोप करीत मुलीच्या वडिलांनी दवाखान्याची तोडफोड केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रहाटणी येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. दामोदर मल्लिकार्जुन गाडेकर (वय 65, रा. नखातेवस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2017 मध्ये दामोदर यांची एकलुती एक मुलगी प्रिया हिला स्वाईन फ्लूची लागण झाल्याने रहाटणीतील मेट्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी तिची प्रकृती खालावल्याने तिला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाला.
याचाच राग मनात धरून गाडेकर हे वारंवार मेट्रो रुग्णालयात येऊन डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मुलगी गेल्याचा आरोप करीत धमकी देत होते. रविवारी सकाळी ते मुलीचा फोटो आणि खुर्ची घेऊन रुग्णालयात आले. मुलीच्या फोटोला हार घालून त्यांनी हातोड्याने रुग्णालयात तोडफोड करण्यास सुरवात केली. यामध्ये रुग्णवाहिका आणि रुग्णालयाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आले.
याबाबत रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, गाडेकर हे रोज दवाखान्यात येऊन धमकी देत होते. काही दिवसांपार्वूी ते कुऱ्हाड घेऊनही परिसरात फिरत होते. काहीवेळा त्यांनी आमच्याकडे पैशाचीही मागणी केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव पुढील तपास करत आहेत.