दारूड्यांना घरी जाण्यास सांगितल्यामुळे तरूणावर कोयत्याने वार
सांगवी
2018-01-02
व्हिएसन्यूज - घरासमोरील चौकात दारू पित बसलेल्या दोन दारूड्यांना घरी जाण्यास सांगणाऱ्या एका तरूणाच्या डोक्यात दोघांनी बीअरची बाटली फोडून कोयत्याने पाठीत व उजव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजता पिंपळे-निलख येथील शिवाजी चौकात घडली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना सांगवी पोलीसांनी अटक केली आहे.
चाणक्य ऊर्फ रोहित कैलास भांडे (वय-34, रा. पिंपळे-निलख) असे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. अशोक सुरेश शिंदे (वय-33), विशाल सुरेश शिंदे (वय-30 दोघे ही शिवाजी चौक, भांडेवाडा, पिंपळे-निलख) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत फौजदार एस. जी. पाटील यांनी माहिती दिली. फिर्यादी व आरोपी शेजारी शेजारी राहतात. घरासमोरील शिवाजी चौकात सोमवारी पहाटे आरोपी तीन वाजेपर्यंत दारू पित बसले होते. फिर्यादींनी आरोपींना घऱी जाण्यास सांगितले आहे. यावरून चिडलेल्या आरोपीने चाणक्य याला शिवीगाळ करत लाथा-बुक्यांनी मारहाण केली. हातातील बिअरची बाटली डोक्यात फोडली. घरी जावून कोयता आणून चाणक्य याच्या पाठीत, उजव्या हातावर वार करून गंभीर जखमी केले. आरोपींना अटक केली असून आरोपी व फिर्यादी यांच्यावर यापुर्वीही सांगवी पोलीस ठाण्यात दोन- तीन गुन्हे दाखल आहेत.