व्हीएस न्यूज - भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या कार्यक्रमानंतर सणसवाडी येथे झालेल्या मोटार तोडफोड, दगडफेक, जाळपोळ घडवून आणल्याप्रकरणी शिवजागर प्रतिष्ठाणचे प्रमुख संभाजी भिडे गुरूजी, हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, ऍट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
रिपब्लिकन सोशलीस्ट पार्टीच्या कार्यकर्त्या अनिता रविंद्र सावळे (वय-39, रा. साई कशीश पार्क, राजवाडेनगर, काळेवाडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवजागर प्रतिष्ठाणचे प्रमुख संभाजी भिडे, हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, ऍट्रॉसिटी, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव व संघटित गुन्हेगारी असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सावळे व त्यांच्या मैत्रिण अंजना गायकवाड या सोमवारी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना करण्यासाठी दुचाकीवरून जात होत्या. आळंदी येथे त्यांची चुकामुक झाली. अंजना गायकवाड या चाकण शिक्रापुरमार्गे जात होत्या. शिक्रापुर टोल नाक्याच्या पुढे सणसवाडीत आरोपी व त्यांच्या साथीदारांनी दगडफेक, जाळपोळ केली. जमावातील काही लोकांनी हत्याराने मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याच्या फौजदार रत्ना सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, भिडे गुरूजी, एकबोटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात येणार आहे.