सांगवीत पवनाथडी जत्रेचे उद्घाटन,
व्हीएस न्यूज – स्त्रीयांचे बचत गट १०० % कर्जाची परत फेड करतात. म्हणून सरकारचा त्यांच्यावर विश्वास असल्याने शुन्यटक्के व्याजदराने कर्ज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मत ॲक्सिस बँक (पश्चिम भारत) च्या सहयोगी उपाध्यक्षा अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने गुरुवार दि. ४ जानेवारी ते सोमवार दि. ०८ जानेवारी २०१८ या कालावधीमध्ये पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते व पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्य विशेष उपस्थितीत झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली पी.डब्लू.डी. मैदान, नवी सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार,आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती शारदा सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती सुनिता तापकीर, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, क प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती फडणवीस म्हणाल्या, महिलांमध्ये बुद्धी कौशल्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. परंतु त्यांना योग्य संधी मिळत नाही. मात्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवनाथडी जत्रेच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजार पेठ उपलब्ध करुन दिली असून महिलांच्या कलागुणांना व कौशल्याला वाव दिला आहे. त्याबद्दल पिंपरी चिंचवड महापालिकेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे प्रतिपादन ॲक्सिस बँक (पश्चिम भारत) च्या उपमुख्य कार्यकारी अध्यक्षा अमृता फडणवीस यांनी केले. बचत गटांच्या महिलांनी मार्केटिंगच्या माध्यमातून स्वतःला स्वावलंबी बनविले आहे. बचत गटामुळे महिला घर बसल्या बरेच उद्योग-धंदे करु शकतात, व स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. घरी बसुन स्वावलंबी होऊ शकतात. महिला बचत गटाच्या महिला 100 % कर्जाची परत फेड करतात. यामुळे बचत गटांच्या महिलांना शासन 0 % व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणार आहे. महिलांना सर्वात जास्त शिक्षणाची गरज आहे. एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित करते. भारतात स्त्रीयांचे प्रमाण सुमारे 50 % आहे. देशातील सर्व स्त्रीया सुशिक्षित झाल्यास या देशाला संपन्न होण्यासाठी हात भार लावतील. तेव्हा सर्व महिलांनी शिक्षण घेणे गरजेचे आहे. पवनाथडी जत्रेसारख्या उपक्रमात महापालिका अव्वल क्रमांकावर आहे. महिला स्वतःचे घर सांभाळून त्या उत्तम प्रकारे मॅनेजर आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रकारच्या मॅनेजर आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गरजू महिलांना मदत करण्यातच जिवनाचे खरे सार्थक आहे. पुणे जिल्हा स्टार्ट अप मध्ये बंगलोर नंतर दुस-या क्रमांकाचे शहर आहे. महाराष्ट्रासह भारत देश लवकरच सुपर पावर होणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीष बापट म्हणाले, पवनाथडी जत्रा या उपक्रमामध्ये बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार पेठ मिळावी म्हणून महापालिकेने स्टॉलस उपलब्ध करुन दिले आहेत. समाजाच्या विविध क्षेत्रातील वेगवेगळे उद्योग, नवनविन कल्पना यांचा समावेश होऊन त्याचा फायदा बचत गटांना होत आहे. राज्य सरकार आणि समाज देखील महिलांच्या सबलीकरणास प्राध्यान्य देत आहे. महिलांमध्ये निसर्गतः कौशल्य असते. त्याचा फायदा या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाला होत आहे. महिलांना केंद्रबिंदु मानुन ह्या सगळ्या घटकांना उत्तेजन देण्याचे काम महापालिका करते. पिंपरी चिंचवड हे जगाच्या नकाशावर औद्योगिक नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. महिलांना या उद्योगासाठी लागणा-या वस्तु निर्माण करुन सहकार्य करता येईल त्यासाठी पुढाकार घ्यावा.
पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, महिला व बाल कल्याण समिती महिलांच्या उत्त्कर्षासाठी नेहमी चांगले निर्णय घेत असते. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व सक्षम करण्यासाठी महापालिका सदैव कार्यरत आहे. मनपाच्या वतीने नुकताच अपंगासाठी दरमहा दोन हजार रुपये पेन्शन योजना चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे महिला बचत गट चांगले व्यावसाय करतील त्यांना आगामी काळात भरीव अर्थसहाय्य केले जाईल. महिलांच्या हातात तिजोरीची चावी दिल्यास ते काट कसरीने खर्च करतात. पुणे शहरा सारखे पिंपरी चिंचवड शहरही वैभवशाली करण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे ते यावेळी म्हणाले.
महिला व बाल कल्याण समिती सभापती म्हणाल्या, पवनाथडी जत्रेची सुरुवात सन २००८-०९ या वर्षा पासून झाली असून हे पवनाथडी जत्रेचे १० वे वर्ष आहे. महापालिका हद्दीतील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण योजने अंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगट वैयक्तिक महिला, यांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी. महिलांना मार्केटिंग कौशल्ये ज्ञात व्हावीत, एकूणच महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, याकरिता दरवर्षी पवनाथडी जत्रा या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. पिंपरी चिंचवड शहरातील महिलांना, महिला बचतगट उत्पादनांबाबत माहिती व्हावी, त्यामधून स्वत:चे उत्पादन सुरु करण्याची त्यांना प्रेरणा मिळावी याकरिता शहरातील बचतगटांना या उपक्रमात सहभागी करुन घेण्यात येते. महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या सुक्या चटण्या, पापड, लोणची, जाम , जेली, विविध प्रकारचे मसाले, विविध गृहोपयोगी उत्पादने, दैनंदिन वापराच्या वस्तू, हस्तकला निर्मित उत्पादने यासारख्या वैशिष्टयपूर्ण उत्पादनांचा समावेश असतो. शिवाय अस्सल खवैय्यांसाठी खाद्य महोत्सव देखील आहे. यामध्ये चुलीवरचे वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, शाकाहारी मासवडी, मक्याचा हुरडा, खानदेशी पुरणाचे मांडे, झणझणीत चुलीवरचं मटण, खेकडा करी, कोंबडी वडे, दमबिर्याणी, कुरकूरीत मच्छी फ्राय अशा खास ग्रामीण मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद परिसरातील नागरिक घेतात. तसेच या जत्रेमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी रोज सायंकाळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यामध्ये मराठी – हिंदी गीतांचा कार्यक्रम, महिलांसाठी “ स्मार्ट होम मिनिस्टर ” हा कार्यक्रम तसेच महाराष्ट्राचा इतिहास लोकनृत्यातून सादर करणारी महाराष्ट्राची गौरवगाथा या कार्यक्रमांचा समावेश असतो. तसेच या जत्रेमध्ये पारंपारिक लोककला जपणारे वाघ्या-मुरळी, गोंधळी, वासुदेव, पिंगळा, इत्यादी कलाकार आपली लोककला सादर करतात. तसेच या जत्रेत बालचमूंचे आकर्षण ठरणारी विविध प्रकारची खेळणी, झुकझुक गाडी आणि उंच झेपावणारे पाळणेही असतात. या पवनाथडी जत्रेत एकूण स्टॉलची संख्या १०१२ इतकी आहे तर सहभागी बचतगटांची संख्या ८७२ इतकी आहे. यामध्ये बचतगटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विक्रीचे ४३४ स्टॉल, महाराष्ट्रीयन मराठमोळ्या शाकाहारी पदार्थांचे २१४ स्टॉल तर मांसाहारी पदार्थाचे इतके २१४ स्टॉल आहेत. एकूण स्टॉलच्या संख्येपेक्षा सहभागी बचतगटांची संख्या जास्त असल्याने स्टॉल
मिळण्यासाठी अर्ज करणा-या बचतगटांना सन्मा. पदाधिका-यांच्या हस्ते बंद चिठ्यांव्दारे सोडत काढून स्टॉलचे वाटप करण्यात आलेले असून एका स्टॉलमध्ये दोन बचतगट याप्रमाणे स्टॉल वाटप करण्यात आले आहे. या प्रदर्शनात दरवर्षी साधारणपणे १ ते १.२५ कोटी रुपयांची विक्री होते व दररोज या जत्रेला किमान ५० ते ६० हजार नागरिक भेट देत असतात. या विक्री प्रदर्शनातून बचतगटातील महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रेरणा मिळत असून हे प्रदर्शन म्हणजे बचतगटांची उत्पादने लाखो ग्राहकांपर्यत कमी वेळेत पोहोचविण्याचे फार मोठे प्रभावी साधन आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व संदिप साकोरे यांनी केले. आभार आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मानले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002