व्हीएस न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात चित्रपट सृष्टीतील अभिनेते-अभिनेत्री येणे काही नवीन नाही. आपल्या कार्यक्रमानुसार ते येतात आणि जातात देखील. मात्र, सिनेसृष्टीमधील आघाडीचा अभिनेता सलमान खान पिंपरी-चिंचवड शहरात आला, अन् नागरिकांचे हाल करून गेला. असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. निमीत्त होते ते पिंपरी- चिंचवड शहरात नव्याने सुरु होणाऱ्या पी.एन.गाडगीळ या सोने विक्रीच्या नव्या दालनाचे.
पिंपरी – चिंचवड परिसरात पी.एन.जी च्या नव्या दालनाच्या शुभारंभासाठी सलमान खान येणार म्हणून संपूर्ण दिवसभर शहरात जोरदार चर्चा सुरु होती. तशी बातमी देखील शहरभर फिरत होती. मात्र, सायंकाळी ५ वाजण्याचा कार्यक्रम असताना देखील दुपारी १ वाजल्यापासून मोरवाडी चौकातील काही रस्ते बंद करण्यात आले होते. त्यामुळे या रस्त्यांवरून दैनंदिन ये-जा करणाऱ्या नागरिकांना दुरवरील पल्ल्यांच्या मार्गांनी तसेच गल्ली बोळातून मार्ग काढावे लागले. याचा परिणाम म्हणजे ज्या रस्त्यांवर रोजची शांतता पाहावयास मिळायची, त्याठिकाणी वाहतुक कोंडी निर्माण झाली.
इतके नव्हे तर, सलमान खान येणार म्हणून नागरिकांनी वेळेच्या आधी येवून कार्यक्रमस्थळी गर्दी केली होती. यामुळे त्याठिकाणाहून जाणाऱ्या वाहन धारकांमध्ये वाद निर्माण झाला होता. सलमान खान येणार म्हणून परिसरातील रस्ते बंद केले. त्यामुळे लांबून वळसा घालून नागरिकांना जावे लागले. सलमान खानला बघण्यासाठी नागरिकांची झालेली झुंबड, त्यात काही नागरिक बाजूला असलेल्या पुलावरून खाली पडले व जखमी झाले, पुलाचे कठडे हि तुटले ,काही नागरिक झाडावरून खाली पडले त्या वेळी झालेल्या गर्दीत नागरिक जखमी झाले याला जबाबदार पि.एन.जी राहणार का ?
तसेच, या परिसरातील निदान केंद्र आणि हॉस्पिटलकडे जाणारे रस्ते बंद केल्याने रुग्णांची मोठी गैरसोय झाली. सर्व रस्ते बंद केले असल्याने रुग्ण दवाखान्यात पोहचू शकले नाहीत, याला जबाबदार कोण ? असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. यावेळी निदान केंद्र आणि हॉस्पिटल जवळ स्पीकर लावण्यात आले. मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाले, रुग्णांना झालेल्या या त्रासाला जबाबदार कोण ? हे सर्व प्रकार घडत असताना पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002