व्हिएसन्यूज -शिवसेना पक्ष गटनेत्या शादान चौधरी यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावून तिघांनी भरस्त्यात पाच लाखांची खंडणी देण्यासाठी धमकी दिली. हा प्रकार सोमवारी सकाळी घडला. त्यामुळे लोणावळा शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चौधरी यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौधरी यांनी लोणावळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या सोमवारी हुडको कॉलनी येथील अनाथ आश्रमात मुलांना नाष्टा घेऊन जात होत्या. गाडीसमोर दुचाकी गाडीवरुन आलेल्या तीन जणांनी गाडी अडवत आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी करत धमकावले असल्याचे सांगितले. त्यानंतर चौधरी यांनी तात्काळ लोणावळा पोलीस ठाणे गाठत या प्रकाराची तक्रार दिली. दरम्यान, एका महिला नगरसेविका भर रस्त्यात अडवून खंडणीची मागणी केल्यामुळे लोणावळा शहरात एकच खळबळ उडाली आहे. तर खंडणी मागणाऱ्या आरोपींनी त्वरीत अटक करण्याची मागणी शहर शिवसेनेने पोलीसांकडे केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रानगट हे तपास करत आहेत.