व्हीएस न्यूज - भोसरीतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या खुनाचा कट पुणे गुन्हे अन्वेषण शाखेने उधळला आहे. याप्रकरणी सातारा येथील कुख्यात गुंडाला अटक केली आहे. व्यावसायिकाच्या खुनाची सुपारी त्यांच्याकडून 35 लाख रूपये उसने घेणाऱ्यानेच दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. चार दिवसापुर्वीच पुण्यातील देवेन शहा या बांधकाम व्यावसायिकाचा खून झाला होता.
अमोल संपत मदने (वय 32 रा. वनवडी, कऱ्हाड) असे या कुख्यात गुंडांचे नाव आहे. उदयसिंह चव्हाण उर्फ नाथजी महाराज व त्याच्या एका नातेवाईकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित रामभाऊ लांडगे (वय 33 रा. भोसरी) या बांधकाम व्यावसायिकाने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित लांडगे यांचा उदयसिंह चव्हाण उर्फ नाथजी महाराज याच्याशी ओळख झाली. लांडगे हे शहरातील मोठे बांधकाम व्यावसायिक असल्याचे चव्हाण याला माहित झाल्याने त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. चव्हाण याचा सातारा जिल्ह्यातील पारगाव खंडाळा येथील आसवले गाव येथे मोठा आश्रम आहे. नाथजी महाराज म्हणून त्याची पंचक्रोशीत ख्याती देखील आहे. या ओळखीचा फायदा घेत चव्हाण याने आश्रमाची अडचण सांगत अमित यांच्याकडे प्रथम 18 लाख तर दुसऱ्यांदा 17 असे 35 लाख रूपये मागून घेतले. ही रक्कम लांडगे यांनी चव्हाणला वारंवार मागितली. परंतू, चव्हाणला पैसे देणे शक्य झाले नाही. त्यामुळे चिडलेल्या चव्हाणने जानेवारी 2018 मध्ये लांडगे यांना जीवे मारण्यासाठी कुख्यात गुंड अमोल मदने याला 20 लाखांची सुपारी दिली.
या प्रकरणाची माहिती सांगवी पोलिसांकडून लांडगे यांना मिळाली. याबाबत खात्री झाल्यानंतर लांडगे यांनी थेट पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधला. ही माहिती आयुक्तालयाने पुणे गुन्हे अन्वेषण शाखेला दिली. अन्वेषण शाखेने तपासाची वेगाने चक्रे फिरवली अन् लांडगे यांना मारण्यासाठी मदनेला सुपारी दिल्याचे उघड झाले. मदने याच्यावर सातारा परिसरात खून, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला सातारा येथून अटक केली. चव्हाण व त्याचा नातेवाईक हे दोघे फरार आहेत.
ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अन्सार शेख, कर्मचारी दिनेश गडांकुश, सिराज शेख, अस्लमखान पठाण, अजय खराडे, राजू केदारी, किरण पवार, किशोर वग्गू, अजित फरांदे, प्रसाद जंगिलवाड, चंद्रकांत महाजन, गणेश नरूटे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002