व्यावसायिकाच्या घरात घुसून मारहाण करीत खंडणीची मागणी
लोणावळा
2018-01-18
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल, दोन दिवसात दुसरी घटना
व्हीएस न्यूज - येथील व्यावसायिक व सामजिक कार्यकर्ते प्रकाश हजारे यांच्या घरात घुसून भरदिवसा मारहाण करत खंडणी मागणाऱ्या पाच जणांच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
प्रकाश माणिक हजारे (वय 41, रा. प्रिच्छली हिल, न्यू तुंगार्ली, लोणावळा) यासंदर्भात लोणावळा पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार शनिवार दि.13 जानेवारी रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास प्रकरणातील आरोपी अमन रियाज अन्सारी व अन्य एक अनोळखी 20 ते 22 वर्षाचा मुलगा हे कार मधून हजारे यांच्या घरी आले. अमन अन्सारी याने मला नगरसेविका शादान चौधरी यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन दे नाही तर तुम्हाला दोघांना खपवून टाकू असे म्हणत चॉपरचा धाक दाखवत हजारे यांना दमदाटी केली होती. यानंतर बुधवारी पुन्हा दुपारी पावणे दोनच्या सुमारास अमन अन्सारी याच्यासह अन्य चार जण झेन गाडी क्र. (एमएच 04-5152) मधून हजारे यांच्या घरी आले. त्यापैकी रिहान रफिक सय्यद याने हजारे यांच्या घरात घुसत त्यांना त्यांचे मित्र प्रफुल्ल रजपुत व महेंद्र कांबळे तसेच त्यांच्या कुटुंबियासमोर शिविगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच तु शादान चौधरीला आमचा निरोप दिला का नाही असे म्हणत दोन दिवसात आम्हाला पाच लाख रुपये मिळाले पाहिजे. तसेच शादान चौधरी यांनी आमच्यावर दाखल केलेली केस काढून नाही घेतली तर दोन दिवसात तुम्हाला दोघांना मारुन टाकतो असे म्हणत दमदाटी केली आणि हजारे यांच्याकडील दहा हजार रुपये काढून घेत त्यांना शर्टच्या कॉलरला धरत घराच्या गेटपर्यत ओढत आणले. त्यावेळी गाडीत बसलेले रियाज उर्फ लादेन अन्सारी गाडीत शिविगाळ करत होता तर आमन अन्सारी चॉपर दाखवत होता, यावेळी रियान याच्या हातातून निसटत हजारे घरात पळाले. प्रकाश हजारे यांच्या फिर्यादीवरुन रियाज रफिक सय्यद (रा. रेल्वे पोर्टरचाळ, लोणावळा), रियाज उर्फ लादेन अन्सारी, आमन रियाज अन्सारी, रिहान रियाज अन्सारी (सर्व राहणार कैलासनगर, लोणावळा) व शाहरुख अस्लम खान (रा. गावठाण, लोणावळा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच लोणावळा नगरपरिषदेतील सेनेच्या गटनेत्या नगरसेविका शादान चौधरी यांना भर रस्त्यात अडवून त्यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला होता.