व्हीएस न्यूज - गाड्या फोडून दुचाकीवरून पसार होणाऱ्या सात ते आठ टोळक्यापैकी एक जण खाली पडला अन् नागरिकांच्या अलगद तावडीत सापडला. नागरिकांनी या समाजकंटकाला बेदम चोप देत पोलीसांच्या हवाली केले. ही घटना आळंदी-मोशी येथे बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली.
अनिल गणेश थोटे (वय-25 रा. संत तुकारामनगर, भोसरी) असे नागरिकांनी चोप दिलेल्या समाजकंटकाचे नाव आहे. मारहाणीत तो किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सिद्धेश बापुसाहेब वहिले (वय-27 रा. डुडुळगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थोटे व त्याचे आठ ते नऊ साथीदारांनी वहिले यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या दोन मोटारींची लोखंडी गज, कोयता, काठ्याने तोडफोड करत दहशत माजवित जोर-जोरात शिवीगाळ करत गोंधळ घातला. आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. गर्दीला पाहून आरोपी तेथून पसार झाले. आरोपी अनिल दुचाकीवरुन जात असताना खाली पडला. नागरिकांनी त्याला पकडून चांगलाच चोप दिला. व भोसरी पोलीसांच्या हवाली केला.