व्हीएस न्यूज - फेसबुकवर ओळख झालेल्या एका परदेशी डॉक्टरने वायसीएममधील एका डॉक्टर महिलेला महागडे पार्सल पाठविल्याचे सांगितले. ते कस्टम कार्यालयातून सोडविण्यासाठी वारंवार पैसे भरण्यास सांगून तब्बल 42 लाखांची फसवणूक केली. ही घटना दि. 13 डिसेंबर 2017 ते 11 जानेवारी 2018 या कालावधीत घडली. डॉ. प्रतिभा भजनदास शामकुवर (वय-55, रा. आस्था हौसिंग सोसायटी, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार माईक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामकुवर या पेशाने डॉक्टर असून पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात त्या बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांची फेसबुकवर परदेशातील माईक या व्यक्तीशी ओळख झाली. त्याने आपण स्वतः डॉक्टर असून एक चॅरिटीही चालवत असल्याचे सांगितले. आरोपीने डॉ. शामकुवर यांना महागडे गिफ्ट पाठविल्याचे सांगितले. ते सोडविण्यासाठी दिल्ली येथून महिला कस्टम ऑफिसर बोलत असल्याचे भासविले. या अमिषाला बळी पडून डॉ. शामकुवर यांनी दिल्ली व बिहार येथील बॅंकांच्या खात्यामध्ये वेळोवेळी तब्बल 41 लाख 82 हजार 900 रूपये भरले. परंतू, महागडे गिफ्ट न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. शामकुवर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक अजय भोसले अधिक तपास करत आहेत.