कौमार्य चाचणी प्रथेविरोधात आवाज उठविणाऱ्या तरुणांना मारहाण
पिंपरी चिंचवड
2018-01-22
व्हीएस न्यूज - कंजारभाट समाजातील नववधूची कौमार्य चाचणी या अनिष्ट प्रथेविरुद्ध व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून आवाज उठविणाऱ्या तरुणांना समाजातीलच अन्य तरुणांनी बेदम मारहाण केली. ही घटना पिंपरी भाटनगर येथे रविवारी रात्री साडेअकरा वाजता घडली.
याप्रकरणी प्रशांत अंकूश इंद्रेकर (वय 25, रा. येरवडा) याने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सनी मलके(वय 25 ), विनायक मलके (वय 22), अमोल भाट (वय 20 ) रोहित रावळकर (वय 21) मेहूल तामचिकर (वय 23, सर्व रा. भाटनगर, पिंपरी) व त्यांचे अन्य 40 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंजारभाट समाजात लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा आजही समाजात कायम आहे. या प्रथेला समाजातील काही तरुणांनी व्हॉट्स ऍपच्या माध्यमातून ग्रुप तयार करून आवाज उठविला. विवेक तमाईचिकर याने हा ग्रुप तयार केला आहे. फिर्यादी प्रशांत इंद्रेेकर त्याचा मित्र सौरभ मछले आणि प्रशांत तामचिकर हे या ग्रुपचे सदस्य आहेत. या माध्यमातून समाजातील ही प्रथा बंद व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मोहिमेला अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांचे हे कृत्य त्यांच्याच समाजातील अन्य तरुणांना पटले नाही.
आरोपी सनी मलके याच्या बहिणीचा रविवारी विवाह होता. फिर्यादी प्रशांत व त्याचे मित्र सौरभ आणि प्रशांत तामचिकर यांना लग्नाचे निमंत्रण देऊन सनी याने बोलावले होते. प्रथेनुसार नंतर जातपंचायत भरली. जात पंचायत संपल्यानंतर प्रशांत हा आपल्या आई व बहिणीला घेण्यासाठी लग्न मंडपात गेला असता तिथे आरोपी सनी व त्याचे साथीदार हे सौरभ मछले याला मारहाण करीत होते. तुम्ही कौमार्य प्रथेविरुद्ध आवाज उठवून जात विरोधी कृत्य करीत आहात असे म्हणत त्याला मारहाण सुरू होती. यावेळी प्रशांत इंद्रेकर व प्रशांत तामचिकर त्याला सोडवायला गेले असता त्यांनाही सनीसह अन्य सर्व आरोपींनी बेदम मारहाण केली. यामध्ये सौरभ मछले याची सोन्याची चैन आणि घड्याळ हरवले. सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता कलम 143,147, 149, 323, 506, 427 अंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.