शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला सावकारी धंदा बंद करा
पिंपरी चिंचवड
2018-01-23
भाजप नगरसवेकांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे बारणेंचे आवाहन
व्हीएस न्यूज - महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून नागरिकांना शास्तीकराबरोबरच चक्रवाढ व्याज लावून नोटीस दिल्या जात आहेत. शास्तीकर भरला नाही, तर मिळकती जप्त करण्यात येतील अशा नोटीसा बजावल्या जात आहेत. त्यामुळे पालिकेने शास्तीकराच्या नावाखाली सावकारी धंदाच सुरु केल्याचा आरोप करत हा धंदा त्वरित बंद करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी भाजप नगरसवेकांच्या घरांसमोर आंदोलन करण्याचे, आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.
महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या या मनमानी कारभारा विरूद्ध नागरीकांमध्ये मोठा असंतोष आहे. शहरातील अनेक नागरिकांनी रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेउन शास्तीकराच्या या प्रश्नाबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेने हद्दीतील अनधिकृत बाधकामांना शास्तीकर लागू केला आहे. या शास्तीकर दंडाच्या रकमेतून महापालिकेला 530 कोटी एवढी रक्क्म मिळणार आहे. भाजपने महापालिका निवडणुकीमध्ये सत्ता आल्यास शास्तीकर पूर्णतः माफ करण्याचे आश्वासन दिले होते. आता भाजपची सत्ता येऊन एक वर्ष होत आले. तरी आजपर्यंत शास्तीकर माफ होऊ शकला नाही, असा आरोप बारणे यांनी केला.
शास्तीकराच्या नावाखाली चालवलेला सावकारी धंदा बंद करावा. महापालिका निवडणुकीत शहरवासीयांना शास्तीकर माफीच्या दिलेल्या आश्वासनाची सत्ताधाऱ्यांनी पूर्ती करावी. शहरातील कोणत्याही नागरिकांनी शास्तीकर तसेच त्यावर आकारण्यात येणारे व्याज भरू नये. भाजपाने दिलेल्या शास्तीकर माफीच्या आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी स्थानिक भाजपा नगरसेवकांच्या घरासमोर धरणे आंदोलन करावे. जेणेकरून त्यांनाही निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण होईल.
महापालिका निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी अनधिकृत बांधकामे नियमित करून शास्तीकर पूर्णत: माफ करण्याचे आश्वासन भाजपाच्या स्थानिक नेत्यांबरोबर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. सत्ता मिळाल्यानंतर त्यांना त्याचा विसर पडत आहे. मी अनेकवेळा मुख्यमंत्र्यांना भेटून शास्तीकर पूर्णतः माफ करण्याची विनंती केली. परंतु, शासनाने शास्तीकर माफ केलाच नाही. उलट नागरिकांना चक्रवाढ व्याज लावून अधिक मनस्ताप दिला आहे.
अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी जी नियमावली बनवली ती अधिक जाचक असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दंडाची प्रक्रीया असल्याने नागरिक अनधिकृत मिळकती अधिकृत करण्यासाठी अर्ज करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. शास्तीकराचा दंड व व्याजाची रक्कम नागरिकांना परवडणारी नसल्याने जो पर्यंत पूर्णतः शास्तीकर पूर्वलक्ष्यी माफ होत नाही तो पर्यंत कोणीही शास्तीकराची रक्कम भरू नये व शास्तीकर व त्याच्या चक्रवाढ व्याजाचा विरोध करावा, असे खासदार बारणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.