व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे अतिक्रमण कारवाई सुरु असताना कारवाईला विरोध करत एका महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास देवकर पार्क येथे घडली. देवीबाई राम पवार (वय-30, रा. देवकर पार्क, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाकडून सांगवी, पिंपळे गुरव परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. मंगळवारी अतिक्रमण विभागाचे पथक सकाळी अकराच्या सुमारास देवकर पार्क येथील अनधिकृत घरांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. पालिकेचे अधिकारी पाहणी करत असताना आपल्या घरावरील कारवाई टाळण्यासाठी देवीबाई पवार यांनी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले होते. त्यांच्यावर औंध जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, संतप्त झालेल्या नागरिकांनी पोकलेन मशीन व जेसीबीवर दगडफेक केली. दगडफेकीनंतर परिसरातील कारवाईचे काम प्रशासनाने तातडीने थांबवले आहे. आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.