दोन दिवसात 17 जणांना भटक्या कुत्र्यांनी घेतला चावा
चिंचवड
2018-01-23
व्हीएस न्यूज -- केशवनगर व चिंचवड गावठाण, थेरगाव, काळेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसामध्ये भटक्या कुत्र्यांनी तब्बल 17 जणांना चावा घेतला आहे. या रूग्णावर पालिकेच्या तालेरा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. भटक्या कुत्र्यांना त्वरीत पकडण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
यामध्ये सात ते आठ वर्षांची आठ लहान मुले तर महिला व पुरुष नऊ असे 17 जणांना भट्क्या कुत्र्याने चावा घेतला आहे. या सर्वांना रस्त्याने जात असताना भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला करुन चावा घेतला. यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाले आहेत.
महापालिकेचे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय म्हणाले की, कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य त्या सर्व उपाय योजना करत असून, भटक्या, पिसाळलेल्या कुत्र्यांना लवकरच पकडण्यात येईल. तसेच महापालिकेकडे रेबीजची लस देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने रुग्णांवरही योग्य ते उपचार केले जातील, असे रॉय यांनी सांगितले. शहरात विविध भागातील कचरा कुंड्यावर भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात असतात. पालिकेचे कुत्र्यांच्या पैदासीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने शहरात कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भटकी कुत्री त्वरीत पकडण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.