सखोल चौकशीच्या आश्वासनानंतर देवीबाईचा मृतदेह नातेवाईकांनी घेतला ताब्यात
पिंपरी
2018-01-24
व्हीएस न्यूज - अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान मंगळवारी देवीबाई तुळशीराम पवार या महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. देवीबाईच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत विश्वगोरा बंजारा सेवासंघाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी बुधवारी दुपारी मृतदेह ताब्यात घेतला.
पिंपळे गुरव येथे मंगळवारी सकाळी अनधिकृत बांधकाम कारवाई दरम्यान देवीबाई तुळशीराम पवार (वय-32) या महिलेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली होती. औंध येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला होता. देवीबाईच्या मृत्यूला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी तसेच विश्वगोरा बंजारा सेवासंघाच्या सदस्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. बुधवार सकाळपासूनच औंध जिल्हा रुग्णालयात बंजारा समाजाचे 500 ते 600 लोक जमा झाले होते. त्यामुळे याठिकाणी पोलीसांचा मोठ्या प्रमाणात फोजफाटा तैनात करण्यात आला होता. दरम्यान, दुपारी परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे बंजारा संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. संबंधित कुटुंबाला योग्य ती नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन स्थानिक लोकप्रतिनीधींनी दिल्याचे विश्वगोरा बंजारा सेवासंघाचे अध्यक्ष युवराज आडे यांनी सांगितले. देवीबाई हिच्यावर पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.