व्हीएस न्यूज - झोप लागल्याने रस्त्याच्या कडेला ओला कॅंब उभी करून आराम करणाऱ्या चालकाना चार जणांच्या टोळक्याने मारहाण करत त्यांच्याकडील साडेअकरा हजारांचा ऐवज लुबाडला. ही घटना रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास वाकड पुलाजवळ घडली.
यशवंत माने (वय-24, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच.14, व्ही 6714 या रिक्षातून आलेल्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. आर. लोंढे यांनी माहिती दिली. माने हे ओला कॅंब चालक आहेत. रविवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास वाकड पुलाजवळ रस्त्यावर त्यांनी कॅब उभी केली. कॅंबमध्येच झोपून गेले. एमएच.14, व्ही 6714 या रिक्षातून आलेल्या चार आरोपींनी माने यांना मारहाण करत त्यांच्याकडील दोन मोबाईल, रोख रक्कम, कागदपत्रे असा अकरा हजार पाचशे रूपयांचा ऐवज लुबाडून नेला. वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.