व्हीएस न्यूज - रस्त्यावर अपघातानंतर अपघातग्रस्त दुचाकीच्या डिक्कीमधील पन्नास हजार रूपयांची रोकड चक्क पोलीस महिलेने चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात बुधवारी घडला असून आवारातील सीसीटीव्हीमध्ये चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पोलीस महिलेला पोलीसांनी अटक केली आहे.
स्वाती जाधव (रा. चाकण) असे अटक केलेल्या पोलीस नाईक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी प्रणिता नंदकिशोर बेंद्रे (वय 21, रा. परंदवडी, ता. मावळ) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तळेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास तळेगाव पोलीस ठाण्यासमोर मोटारीने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांचे वडील नंदकुमार बेंद्रे हे किरकोळ जखमी झाले. त्यांना त्वरीत सोमाटणे फाटा येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तळेगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक स्वाती जाधव यांनी अपघातग्रस्त दुचाकी पोलीस स्टेशनमध्ये लावली. यावेळी जाधव यांनी बेंद्रे यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये असलेली 50 हजार रुपयांची रोख रक्कम काढून स्वतःकडे ठेवली. जखमी बेंद्रे यांनी आपल्या मुलीला गाडीच्या डिक्कीमध्ये पन्नास हजार रूपये असल्याचे सांगितले. त्यांनी त्वरीत पोलीस ठाणे गाठत डिक्की उघडून पाहिली. मात्र, डिक्कीत पैसे आढळून आले नाहीत. पोलीसात फिर्याद दिल्यानंतर तळेगाव पोलीस ठाण्याच्या आवारातील सीसीटीव्हीत ह आरोपी जाधव यांनी पैसे चोरल्याचे दिसून आले. आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.