व्हीएस न्यूज - भोसरी येथील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्पोरेट इमारतीत लागलेल्या आगीतून अडकलेले १३ कर्मचारी बचावले, त्यात ८ महिलांचा समावेश होता. अग्निशमन दलाच्या जांबाज जवानांच्या धाडसामुळे या कर्मचाऱ्यांचे प्राण वाचले. पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे आणि प्रताप चव्हाण यांच्यासह ८ जवानांच्या टीमने ही कामगिरी केली.
भोसरी येथील डॉ. डी.वाय. पाटील आयुर्वेदिक कॉलेज शेजारी के.पी.ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची चार मजली कार्पोरेट इमारत आहे. येथे ३२ कर्मचारी कामाला होते. आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ए.सी.मधे बिघाड झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. जिन्यातच आग लागल्यामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर काम करत असलेले १३ कर्मचारी अडकले होते. हळूहळू आग पसरत होती. धुरांचे लोट देखील वाढत होते. अडकलेले कर्मचारी गुदमरून जाण्याच्या भिती निर्माण झाली होती. दरम्यान आग लागल्याचे समजताच तात्काळ पिंपरी आणि भोसरी येथील अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. उपअग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे आणि प्रताप चव्हाण यांच्यासह ८ जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करत आग आटोक्यात आणली. जवानांनी दाखविलेल्या या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत कंपनीतील कागदपत्रे जळून खाक झाली असून एका चार चाकी वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहाणी झालेली नाही.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002