व्हीएस न्यूज - काँग्रेस पक्षाने गेली ७० वर्ष देशातील सर्वसामान्य दलितांचा वापर फक्त राजकीय सत्तेच्या राजकारणासाठी केला. मात्र दलितद्वेष करणे ही काँग्रेसची मूळ संस्कृती असल्याचा घणाघात राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केला. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर जातीवाचक टीका करताना नरेंद्र मोदी हे ‘नीच आदमी’ व ‘असभ्य’ आहेत, असा उल्लेख केला. या वक्तव्याचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
या वक्तव्यानंतर राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी निगडी पोलीस ठाण्यात काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात तक्रारअर्ज दाखल केला आहे. मणिशंकर आययर यांच्या विरोधात कलम २९८, ४९९, ५००, ५०१, १२० अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार महेश लांडगे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, महिला आघाडी शहराध्यक्षा शैला मोळक, ‘अ’प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसेवक माऊली थोरात, बाबू नायर, मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस संजय मंगोडेकर, युवा मोर्चाचे संभाजी फुगे, भाई सोनवणे, विशाल वाळुंजकर, वैजनाथ शिरसाठ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार साबळे म्हणाले की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेले विधान हे आक्षेपार्ह आहे. या विधानातील नीच हा शब्द जातीय विद्वेष वाढविणारा आहे. हे विधान पंतप्रधान व देशाची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करणारे आहे.
देशातील दलित, उपेक्षित, वंचीत वर्गाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची भूमिका मणिशंकर अय्यर यांच्या विधानातून स्पष्ट होते. नरेंद्र मोदी यांचे देशाच्या विकासासाठी सुरू असलेले कार्य पाहून काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकल्यामुळेच त्यांच्याकडून अशाप्रकारची जातीवाचक व द्वेषपूर्ण विधाने करण्यात येत आहेत. या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली असून त्यांच्याविरोधात योग्य ती न्यायालयीन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार साबळे यांनी यावेळी केली.
याबाबत निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी सांगितले की, या तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करणे शक्य आहे का, याबाबत कायदेशीर सल्लागाराबरोबर चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येईल. केवळ तक्रार आली म्हणून गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, त्यासाठी पुराव्याची आवश्यकता असते. कोणत्या कलमाखाली गुन्हा दाखल करायचा याबाबतही कायदेशीर सल्ला घेण्यात येईल असे ही ते म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002