दारूसाठी पैसे न दिल्याने केला खून; आकुर्डीतील खूनाचे रहस्य उलघडले
पिंपरी – चिंचवड
2017-12-19
एक जण गजाआड; एक अल्पवयीन ताब्यात
व्हीएस न्यूज - येथील ग्रीव्हज कंपनीजवळील झाडीत 8 डिसेंबर रोजी रात्री एका इसमाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. याप्रकरणी निगडी पोलिसांनी कसून तपास करत दहा दिवसात मुख्य आरोपीसह एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून इसामाचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
अविनाश पोपट नलावडे (वय 25 रा. दत्तनगर, चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. अनिल रामधारी विश्वकर्मा (वय 37 रा. अयाप्पा मंदिराजवळ, काळेवाडी) यांचा 8 डिसेंबर रोजी रात्री डोक्यात दगड घालून खून केला होता.
याबाबत पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांनी माहिती दिली. विश्वकर्मा यांचा खून झाल्याच्या दिवशी त्यांचे मित्र विनोद कुमार जैस्वाल व अखिलेश गौतम त्यांच्याबरोबर असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. 8 डिसेंबर रोजी विश्वकर्मा, जैस्वाल व गौतम तिघे एकाच दुचाकीवर आकुर्डीच्या दिशेने जात होते. लघुशंकेसाठी कंपनीजवळच्या मोकळ्या आवारात थांबले असताना अचानक तीन अनोळखी इसम दुचाकीवरुन आले. त्यांनी विश्वकर्मा व त्यांच्या मित्राला झाडीमध्ये चालण्यास सांगून दारुसाठी पैसे द्या असे म्हणत धमकवाले.
विश्वकर्मा यांनी त्याला विरोध केला असता तिघांनी विश्वकर्माला दगडाने मारण्यास सुरुवात केली. यावेळी विश्वकर्मा यांचे मित्र जैस्वाल व गौतम हे विश्वकर्मा यांना सोडवायला गेले असता त्यांनाही आरोपींनी दगडाने मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे दोघेजण जीव मुठीत धरून पुणे-मुंबई महामार्गावरुन आकुर्डीच्या दिशेने पळून गेले. विश्वकर्मा मात्र मोकळ्या जागेतील झाडीमध्ये पळाले. यावेळी आरोपीनी त्यांना पैसे देण्यास धमकावले त्याला विरोध केला असता डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. या माहितीच्या आधारे निगडी पोलीसांनी आरोपींचा तपास सुरू केला. पोलीस नाईक संदीप पाटील यांना बातमीदाराकडून आरोपी नलावडे हा भोर तालुक्यातील नरे गावात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार नरे येथील एका हॉटेलमधून नलावडे याला पोलीसांनी अटक केली.