व्हीएस न्यूज - लवकरच आपली प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टला ऑनलाईन खरेदी क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अॅमेझॉन खरेदी करण्याची शक्यता वर्तवली जात असून माध्यमांतूनही याबाबत वृत्त येत आहेत. फ्लिपकार्ट सध्या वॉलमार्टशी भागीदारी कराराबाबत चर्चा करत आहे.
भारतातील आपली प्रतिस्पर्धी कंपनी फ्लिपकार्टशी अॅमेझॉनने खरेदीबाबत चर्चा सुरू केली आहे. पण वॉलमार्टशी फ्लिपकार्टचा करार होण्याची जास्त शक्यता आहे. या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार अॅमेझॉनशी फ्लिपकार्टचा करार होण्याची शक्यता कमी आहे. तसेच अशाप्रकारचा कोणताही करार बाजारात एकाधिकारशाही तयार करेल, अशीही काळजी व्यक्त केली जात आहे. कारण अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन कंपन्यांचेच भारतीय बाजारात वर्चस्व आहे.
अॅमेझॉनशी याबाबत वृत्तसंस्थेने संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. फ्लिपकार्टचे ४० टक्के समभाग खरेदी करण्याबाबत वॉलमार्ट चर्चा करत आहे. हा वॉलमार्टचा सर्वात मोठा व्यवहार ठरु शकेल, असे वृत्त फेब्रुवारीमध्ये आले होते.
व्हीएस न्यूज – सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संसदेच्या अधिवेशनात होत असलेल्या गोंधळावरुन जुंपली असून विविध मुद्यांवरुन संसदेच्या अधिवेशनात मोठा गदारोळ झाला. संसदेचे त्यामुळे कामकाज होऊ न शकल्यामुळे २३ दिवसांचे वेतन न स्वीकारण्याचा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांनी घेतला असल्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिली आहे.
संसदेच्या अधिवेशनाचा अमूल्य वेळ गदारोळामुळे कामकाज होऊ न शकल्याने वाया गेला. कॅबिनेटच्या बैठकीतही याचे पडसाद पाहायला मिळाले. बहुतांश खासदारांनी या बैठकीत वेतन न स्वीकारण्याची भूमिका मांडल्यामुळे जनतेमध्ये चांगला संदेश जाईल, असे मत अनेक खासदारांनी मांडले. संसदेचे कामकाज विरोधकांमुळेच होऊ शकले नाही, असा संदेश लोकांपर्यंत जावा, असा भाजपचा प्रयत्न आहे. यासोबतच संसदेच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ एनडीएचे खासदार निदर्शनेदेखील करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
व्हीएस न्यूज – अचानक आलेला जोरदार पाऊस आणि गारपिटीमुळे येथील व्होंटिमिट्टा गावात चार जणांचा मृत्यू झाला तर जवळपास ३० जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यात थोडक्यात बचावले आहेत.
व्होंटिमिट्टा येथे प्रसिद्ध कोदंदरामा मंदीर असून रामनवमी उत्सवानिमित्त या मंदिरात ‘श्रीराम कल्यानम’ (भगवान राम यांचा लग्न समारंभ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चंद्राबाबू नायडू आणि असंख्य भक्त यासाठी उपस्थित होते. पण याठिकाणी अचानक जोरदार पाऊस आणि गारपीट सुरू झाल्याने कार्यक्रमात बाधा आली. कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेला मंडप सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे आणि गारपिटीमुळे कोसळला. या दुर्घटनेत काही भक्त जखमी झाले तर चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. तथापी, मुख्यमंत्री नायडू हे दुर्घटना घडली तेव्हा मंदीर परिसरात नव्हते, असे कडपा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.
व्हीएस न्यूज – माजी कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यात तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे; असा आरोप करत शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्राने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावे, असे मत व्यक्त केले. शरद पवार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमासाठी सोलापुरात आले असता त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.
पवार यावेळी बोलताना म्हणाले, की राज्यातील अनेक जिल्हा बँकेच्या नोटाबंदीमधील नोटा अद्याप बदलून दिल्या नाहीत. कर्जमाफी हा निर्णय योग्य असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तरच शेतकऱ्यांना फायदा होईल. ७१ हजार कोटींची कर्जमाफीचा निर्णय युपीए सरकारच्या काळात आम्ही जाहीर केला. या निर्णयाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ६०० कोटींचा फायदा झाल्यामुळे शेतकऱ्याला उभारी मिळाली. सध्या शेतकरी आत्महत्येच्या प्रमाणात ४२ टक्क्यांनी वाढ झाली असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, की युपीए सरकार असताना, पंतप्रधान मनमोहन सिंगाच्या काळात दरवर्षी ३ लाख तर शेवटच्या २ वर्षाच्या काळात ५ लाख ८० हजार वार्षिक नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या मात्र वार्षिक कोटींचे आकडे सांगणारे सध्या नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
व्हीएस न्यूज – काँग्रेसचे नेते कपिल सिबल यांनी मोदी सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) लोकांना न्यायव्यवस्थेत नेमण्यासाठी न्यायव्यवस्थेवर हल्ला करत असल्याचा आरोप केला आहे. या अगोदर भाजपने देशातील शिक्षण संस्थांच्या महत्त्वाच्या पदांवर संघाच्या प्रचारकांना नेमले आहे. ते आता संघाच्या प्रचारकांना किंवा तशी विचारसरणी असणाऱ्या लोकांना न्यायव्यवस्थेत नेमत आहेत.
माजी कायदामंत्री सिबल पुढे म्हणाले की, हे आम्हाला मान्य नाही आणि याचा आम्ही विरोध करू. जर गरज पडली तर आम्ही हा मुद्दा न्यायसंस्थेत देखील मांडू. देशातील प्रत्येक संस्थेवर हल्ला होत असून माध्यमे आणि न्यायव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होत आहे. न्यायव्यवस्था नियंत्रणाबाहेर जात असल्याचे या सरकारला वाटत असल्यामुळे ते न्यायव्यवस्थेला नियंत्रित करण्याचा विचार करत आहेत. तसे जर झाले तर लोकशाही कमकुवत होईल. सिबल यांनीहे सांगताना सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायाधीश चेलमेश्वर यांच्या विधानाचीही आठवण करून दिली. सरकार न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करत असल्याचे न्यायमूर्ती चेलमेश्वर यांनी नुकतेच म्हणत हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे म्हटले होते.
व्हीएस न्यूज - फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया संकेतस्थळांवर वेळ वाया घालविणाऱ्या विद्यार्थ्यांना आळा बसावा, यासाठी सोशल मीडियावर निर्बंध आणण्याचा विचार बांगलादेश सरकार करत आहे. हे अॅप म्हणजे डिजिटल अफू असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
“फेसबुक व यासारख्या अॅपवर कोट्यवधी विद्यार्थी वेळ वाया घालवतात. त्यामुळे त्यांचे लक्ष विचलित होते. याचा परिणाम त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनावर होत आहे,” असे बांगलादेश टेलिकम्युनिकेशन अँड रेग्युलेटरी कमिशनचे अध्यक्ष शाहजहान महमूद यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले.
या संदर्भात उचलण्यात येणाऱ्या पावलांबाबत विचारले असता महमूद म्हणाले, की सोशल मीडिया अॅपसाठीचे शुल्क वाढविण्यावर विचार सुरू आहे. याची अंमलबजावणी कशी करायची, याचा सूक्ष्मपातळीवर विचार सुरू आहे. शैक्षणिक व बौद्धिक लाभाच्या संकेतस्थळांवर याचा परिणाम होता कामा नये, असे ते म्हणाले. सध्या हा प्रस्ताव बंधन आणणारा वाटत असला तरी दीर्घकालीन दृष्टीने तो विद्यार्थी व देशाच्या दृष्टीने फायद्याचा ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्याच महिन्यात बांगलादेशमध्ये 3जी ऐवजी 4जी सेवा सुरू करण्यात आली होती.
व्हीएस न्यूज - पोलिस ठाण्यात अधिकाऱ्यासमोर इंग्रजी बोलणे एका तरुणाला महागात पडले. इंग्रजी शब्द ऐकताच पारा चढलेल्या ठाणेदाराने या विद्यार्थ्याला कोठडीत डांबून त्याची धुलाई केली.
बिहारमधील खगडिया या गावातील चौथम पोलिस ठाण्यात ही घटना घडली. अभिषेक असे या घटनेतील पीडित मुलाचे नाव आहे. अभिषेकच्या मामाला पोलिसांनी एका प्रकरणात चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले होते. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी तो ठाण्यात गेला होती. त्याने ठाणे अंमलदारांना मामांना ताब्यात घेण्याचे कारण विचारले. मात्र ही चौकशी त्याने इंग्रजीत केली होती.
अभिषेकने इंग्रजीत विचारणा केल्यावर अधिकाऱ्याचा पारा चढला. त्यांनी अभिषेकला कोठडीत डांबून तीन दिवस त्याला मारहाण केली. तसेच बाईक चोरीच्या घटनांमध्ये तो सामील असल्याचा आरोपही त्याच्यावर लावण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्याचे नातेवाईक ठाण्यात पोचले तेव्हा ठाणे अंमलदारांनी पीआर बाँड भरून घेऊन त्याला घरी सोडले. त्यानंतर त्याला इस्पितळात दाखल करण्यात आले. अभिषेक हा पाटण्यातील सेंट जोसेफ स्कूलमध्ये बारावीत शिकतो आणि तो चौथम येथे आपल्या घरी आला होता. बाईक चोर असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मला तीन दिवस कोठडीत डांबले आणि प्रचंड मारहाण केली, असे त्याने सांगितल्याचे फर्स्ट पोस्ट या संकेतस्थळाने म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला मुस्लिमविरोधी प्रतिमेचा फटका बसला आहे. याचा प्रतिकूल परिणाम पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत होऊ शकतो, असे मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेले केंद्रीय अन्नमंत्री राम विलास पासवान यांनी म्हटले आहे. ज्येष्ठ राजकारणी असलेले रामविलास पासवान हे लोक जनशक्ती पक्षाचे प्रमुख असून ते भाजपचे सहयोगी आहे.
रॉयटर्स वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पासवान यांनी वरील वक्तव्य केले. मोदी हे पंतप्रधान म्हणून परत निवडून येतील, परंतु त्यासाठी भाजपला मुख्यतः उच्चजातीय हिंदूंसाठी काम करणारा पक्ष अशी आपली प्रतिमा बदलण्यावर काम करावे लागेल, असे पासवान म्हणाले.
“सरकार जे काही करत आहे ते प्रत्येकासाठी करत आहे; अगदी अल्पसंख्य समाजासाठीही त्यांनी खूप काम केले आहे. परंतु कितीही काम केले तरी अल्पसंख्यक आणि अनुसूचित जातींमध्ये (सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय वर्ग) भाजपची प्रतिमा बदलत नाही,” असे पासवान म्हणाले. भाजपच्या उच्चवर्णीय हिंदूंचा पक्ष या प्रतिमेचा विरोधी पक्ष फायदा घेऊ शकतात आणि त्याचा आक्रमकपणे प्रतिकार करायला हवा, असे मतही पासवान यांनी व्यक्त केले आहे.
भाजपने मात्र पासवान यांचे हे वक्तव्य चांगल्या भावनेने व्यक्त केलेले निरीक्षण असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षांनी प्रतिमा डागाळण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी त्यांना यात यश आलेले नाही, असे भाजप प्रवक्ते जी. पी. एल. नरसिंह राव म्हणाले.
व्हीएस न्यूज – गुगलने भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या १५३व्या जन्मदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली असून गुगलने डुडलद्वारे पारंपरिक वेशात आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्याचे पदवी प्रमाणपत्र दाखवतानाचे त्यांचे रेखाचित्र साकारुन त्यांना अभिवादन केले. हे चित्र बंगळूरूस्थित रेखाचित्रकार कश्मिरा सरोदे यांनी साकारले आहे.
१८८६ मध्ये आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन अमेरिकेहून आनंदीबाई भारतात परतल्या. त्यांनी त्यानंतर कोल्हापूरच्या अल्बर्ट एडवर्ड रुग्णालयात महिलांच्या वॉर्डसाठी फिजिशिअन म्हणून कार्यभार स्वीकारला. भारतातील केवळ पहिली महिला डॉक्टरच नव्हे तर सर्वात कमी वयात अर्थात अवघ्या १९व्या वर्षात वैद्यकीय पदवी घेतलेली त्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या.
३१ मार्च १८६५ ला पुण्यातील एका सधन कुटुंबात जोशी यांचा जन्म झाला होता. त्यानंतर वयाच्या ९व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. आनंदीबाईंना वयाच्या १४ वर्षी मुलगा झाला होता,पण त्याचा वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे मृत्यू झाला आणि हाच प्रसंग त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांनी त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांच्यातील शिक्षणाची आवड पाहून त्यांच्या पतीने त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अमेरिकेतील पेनसिलव्हेनिया येथील महिला वैद्यकीय महाविद्यालयातून आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षणाची पदवी मिळवली. त्यानंतर ड्रेक्झल विद्यापीठ महाविद्यालायतून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर महिलांसाठी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन त्या भारतात परतल्या.
पण आनंदीबाईंना दुर्दैवाने खूपच कमी आयुष्य लाभले. वयाचे २२वे वर्ष पूर्ण होण्याआधीच क्षयरोगाने त्यांचा मृत्यू झाला. असे असले तरी त्यांच्या कार्याने पुढील अनेक पिढ्यांमधील महिलांना प्रोत्साहन दिले. दरम्यान, शुक्र ग्रहावरील एका विवराला आनंदीबाईंचे नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज - देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी भेट घेत त्यांना श्री संत तुकाराम महाराजांची हिंदी आवृत्ती असलेली गाथा भेट दिली.
खासदार बारणे म्हणाले, जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे मंदीर हे मावळ मतदार संघात श्री क्षेत्र देहुगाव येथे आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग सुपरिचीत असून देशातील मान्यवरांपर्यंत गाथा पोहचावी या हेतुने अनेक प्रमुख मान्यवरांच्या भेटी दरम्यान त्यांना संत तुकाराम महाराजांची गाथा भेट देत आहे. देहु संस्थानच्या वतीने गाथेचे हिंदीतुन भाषांतर केले असल्याने अनेक हिंदी भाषीकांना संत तुकाराम महाराजांचे अभंगातील विचार सहजतेने समजतात. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कारकीर्दीत संत तुकाराम महारांजावर पोष्टाचे तिकीट व नाणे प्रसिद्ध केले होते. समाजामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेतील विचार पोहचावे हीच संकल्पना असल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यापुर्वी बारणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही संत तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली आहे.
व्हीएस न्यूज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने रामलीला मैदानावर बूट भिरकवल्याचा प्रकार समोर आला आहे. अण्णांनी मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्री यावेळी व्यासपीठावरून भाषण करत असताना हा प्रकार घडला. अण्णा हजारे यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर आंदोलन सुरू केले होते. अण्णांनी आपले केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,केंद्रीय कृषी राज्यमंत्री केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी आणि अण्णा हजारे यांचे ध्येय एक असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र सरकार लोकपाल आणि लोकायुक्ताची नियुक्ती करण्यासाठी पुढाकार घेईल असे आश्वासन अण्णांना दिले. यावेळी मुख्यमंत्री बोलत असताना उपस्थितांमधून एकाने बूट व्यासपीठाच्या दिशेने भिरकावल्यामुळे व्यासपीठावर काही काळ चलबिचल झाली. पण त्याकडे दुर्लक्ष करत मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002