राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची खासदार बारणे यांनी घेतली भेट
पिंपरी
2018-03-30
व्हीएस न्यूज - देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी भेट घेत त्यांना श्री संत तुकाराम महाराजांची हिंदी आवृत्ती असलेली गाथा भेट दिली.
खासदार बारणे म्हणाले, जगदगुरू संत तुकाराम महाराजांचे मंदीर हे मावळ मतदार संघात श्री क्षेत्र देहुगाव येथे आहे. संत तुकाराम महाराजांचे अभंग सुपरिचीत असून देशातील मान्यवरांपर्यंत गाथा पोहचावी या हेतुने अनेक प्रमुख मान्यवरांच्या भेटी दरम्यान त्यांना संत तुकाराम महाराजांची गाथा भेट देत आहे. देहु संस्थानच्या वतीने गाथेचे हिंदीतुन भाषांतर केले असल्याने अनेक हिंदी भाषीकांना संत तुकाराम महाराजांचे अभंगातील विचार सहजतेने समजतात. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कारकीर्दीत संत तुकाराम महारांजावर पोष्टाचे तिकीट व नाणे प्रसिद्ध केले होते. समाजामध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेतील विचार पोहचावे हीच संकल्पना असल्याचे खासदार बारणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.यापुर्वी बारणे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनाही संत तुकाराम महाराजांची गाथा भेट दिली आहे.