व्हीएस न्यूज - दोघांवर चाकुने वार करण्यात आले असून ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
जग्गु पुजारी (वय 32) व सचिन तापकीर (वय 35) दोघे राहणार पिंपरी अशी जखमींची नावे आहेत. जग्गु याच्या पाठीवर तर सचिन याच्या हातावर व डोक्यावर वार करण्यात आले आहेत. जुन्या वादातून हे वार करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जखमींवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
व्हीएस न्यूज - डॉ. आंबेडकर चौकात मंगळवारी कोणतीही परवानगी न घेता तब्बल तीन तास पुणे-मुंबई महामार्ग रोखणाऱ्या आंदोलकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता चौकात जमाव जमा करणे, रास्ता रोको करणे, सरकार विरोधी घोषणा देणे याविरोधात सुमारे 300 ते 350 आंदोलकांवर पिंपरी पोलीस ठाण्यात बेकायदा जमाव जमवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणसही अटक केलेली नाही. या काळात अफवा पसरवणारे प्रक्षोभक वक्तव्य करणारे व तोडफोड करणाऱ्यांवरही पोलीस कारवाई करणार आहेत.
व्हीएस न्यूज - मद्यधूंद अवस्थेतील चार जणांच्या टोळक्याने कॉलनीतील पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची कोयते, दगडांनी तोडफोड केली. यामध्ये आठ वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पिंपळेगुरवमध्ये घडली. याबाबत बर्नाड चंद्रकांत मिरपगार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार आरोपींनी मद्यप्राशान केले होते. बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आरोपींनी पिंपळेगुरव येथील ओंकार आणि मोरया कॉलनीत पार्किंगला लावलेल्या आठ वाहनांची कोयते, दगडांनी तोडफोड केली. यामध्ये आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. सांगवी ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - गुजरातचे नवनिर्वाचित आमदार जिग्नेश मेवानी यांनी रविवारी शनिवारवाड्यावर आयोजित परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळेच भीमा कोरेगाव येथे दोन गटांमध्ये वाद झाला. मेवानी आणि जेएनयू छात्र संघटनेचे उमर खालिद हे या घटनेला जबाबदार असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार अक्षय बिक्कड आणि आनंद धोंड यांनी केली आहे.
शनिवारवाड्यावर भीमा कोरेगावच्या संग्रामाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या एल्गार परिषदेत त्यांनी भडकावू भाषण दिल्याचा आरोप करत त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. दरम्यान, अशा स्वरूपाचा तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, पुढील कार्यवाहीसाठी तो विश्रामबाग पोलिसांकडे पाठवला आहे, असे डेक्कनचे वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी सांगितले; पण विश्रामबागचे वरिष्ठ निरीक्षक अप्पासाहेब शेवाळे यांनी अशा स्वरूपाची तक्रार अद्याप प्राप्त झालेली नाही, असे स्पष्ट केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002