व्हिएस न्युज - पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेने सुरू केलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे. वारजे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या सात महिन्यांपासून फरार असलेल्या पाहिजे आरोपीला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने अखेर जेरबंद केले आहे. मनीष शांताराम गंगावणे (वय ३०, रा. अचानक चौकाजवळ, ओम मित्र मंडळासमोर, वारजे माळवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १७७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३(५), आर्म ॲक्ट कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) १९९९ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी मनीष गंगावणे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.

दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस कर्मचारी किशोर शिंदे, कैलास लिम्हण आणि योगेश झेंडे यांना गोपनीय माहिती मिळाली. आरोपी पुणे परिसरातील डेक्कन येथील बीड अंडा राईस हॉटेलच्या पाठीमागे असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने कारवाई केली.
पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून आरोपीला चारही बाजूंनी घेरले. त्याला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला संबंधित तपास अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते, पोलीस उपआयुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट ३ चे पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष भांडवलकर तसेच पोलीस अंमलदार किशोर शिंदे, कैलास लिम्हण, योगेश झेंडे आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपींना शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, गुन्हे शाखेच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
