१५ डिसेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन व उपोषणाचा समीर शेख यांचा इशारा
व्हिएस न्युज - मावळ तालुक्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि संलग्न श्री साईबाबा अन्नछत्र मंडळाच्या आर्थिक व्यवहारांवरून वाद निर्माण झाला आहे. ट्रस्टमधील काही विद्यमान विश्वस्तांवर कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराचे, दानपेटीतील रकमेच्या अफरातफरीचे तसेच बनावट ठराव आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ट्रस्टचे तहहयात विश्वस्त उस्मान दगडू शेख यांनी केली आहे. या संदर्भात गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत उस्मान शेख यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी तहहयात विश्वस्त समीर शेख, ॲड. अनघा कुलकर्णी, अक्षय धावरे, रामभाऊ गोपाळे यांच्यासह शिरगावमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत समीर शेख यांनी सांगितले की, श्री साईबाबा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था नोंदणी कार्यालय, पुणे येथे ९ सप्टेंबर २००२ रोजी नोंदणी करण्यात आली असून ट्रस्टचा नोंदणी क्रमांक इ/३६७४/पुणे असा आहे.
ट्रस्टमध्ये एकूण सात विश्वस्त असून तत्कालीन आमदार प्रकाश देवळे हे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर रवी जाधव व उमेश कविटकर यांची विश्वस्त म्हणून नोंद करण्यात आली. मात्र, त्यानंतर संबंधित विश्वस्तांकडून इतर विश्वस्तांना विश्वासात न घेता आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप समीर शेख यांनी केला. मंदिरात देशभरातून तसेच परदेशातून हजारो साईभक्त दर्शनासाठी येतात.
भाविकांकडून रोख रक्कम, सोने, चांदी, हिरे आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात दान दिले जाते. दरमहा लाखो रुपयांचा निधी जमा होत असतानाही संपूर्ण देणगीची रक्कम ट्रस्टच्या बँक खात्यात जमा केली जात नसल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
दानपेट्या उघडण्याच्या प्रक्रियेत अनियमितता, रोख रकमेच्या हिशेबात तफावत, बँकेत जमा केलेल्या नोटांच्या तपशिलात विसंगती तसेच दानपेटीतील रकमेच्या नोंदींसाठी कथित बनावट कागदपत्रे तयार केल्याचेही आरोप करण्यात आले. संबंधित कागदपत्रांवरील हस्ताक्षर एकाच व्यक्तीचे असल्याचा संशय असून त्याची हस्ताक्षरतज्ज्ञांकडून तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
याशिवाय मंदिराच्या मालकीच्या जागेतील दुकानदारांकडून मिळणाऱ्या भाड्याच्या उत्पन्नाचाही योग्य हिशेब ठेवला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणांबाबत विश्वस्त आणि ग्रामस्थांनी स्थानिक पोलीस प्रशासन तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालय, पुणे येथे अनेकदा लेखी तक्रारी दिल्या आहेत. मात्र, तक्रारींवर अपेक्षित कारवाई झालेली नसल्याने संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवरही शेख यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काही अधिकारी संबंधित विश्वस्तांना मदत करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला.
अन्नछत्रातील दूषित पाण्यामुळे नदी प्रदूषणाचा आरोप
श्री साईबाबा मंदिरात भाविकांकडून जमा होणाऱ्या निधीचा उपयोग मंदिराच्या व्यवस्थापनासोबतच शिरगावच्या स्थानिक विकासकामांसाठीही करण्यात यावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच अन्नछत्रातून निर्माण होणारे दूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पवित्र नदीत सोडले जात असल्याचा आरोप करण्यात आला. यामुळे नदीचे प्रदूषण होत असून पर्यावरणाला धोका निर्माण होत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
१५ डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा
या संपूर्ण प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास १५ डिसेंबर २०२६ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उर्वरित विश्वस्त आणि शिरगाव ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन व आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा तहहयात विश्वस्त समीर शेख यांनी दिला.
दरम्यान, ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांबाबत करण्यात आलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असून संबंधित यंत्रणांनी सर्व कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि तक्रारींची पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
