व्हीएस न्यूज - अरबी समुद्रात मोठा तेलसाठा ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) या कंपनीला सापडला असून सध्याच्या मुंबई हाय तेलक्षेत्रानजीक हा साठा असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली.
त्यांनी या साठय़ाची माहिती लोकसभेमध्ये प्रश्नोत्तर तासात एका लेखी उत्तरात दिली. तो साठा मुंबई हायच्या पश्चिमेला स्थित असून त्यातून पूर्ण क्षमतेने उपसा केल्यास देशाच्या तेल उत्पादनात वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी केले. याच क्षेत्रात आणखी नऊ ठिकाणी खोदकाम चालू असून तेथेही कच्चे इंधन तेल आणि नैसर्गिक वायू सापडेल, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. त्या आधारावर उत्खनन सुरू आहे.
साधारणतः ३ कोटी टन तेल नवीन सापडलेल्या साठय़ात मिळू शकेल. तसेच तेवढय़ाच प्रमाणात नैसर्गिक वायूही मिळेल, असे त्यांच्या उत्तरात म्हटले आहे. सध्या मुंबई हायमधून दिवसाला २ लाख ५ हजार बॅरल तेल उपसण्यात येत आहे. नव्या साठय़ामुळे त्यात आणखी २० हजार बॅरल्सची भर पडू शकेल. ओएनजीसीने २०१६-१७ या वर्षात २ कोटी ५५ लाख टन तेलाचे उत्पादन केले. ते २०१९-२० पर्यंत २ कोटी ९० लाख टनांपर्यंत पोचू शकेल, असे कंपनीच्या अधिका-यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.